सातारा - सहयाद्रि व्याघ्र प्रकल्पात आधीच एक पट्टेरी वाघ असताना आता नव्या वाघाचं आगमन झालंय. हा वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला असून तो नर जातीचा आहे. नव्या पट्टेरी वाघाची ओळख पटलेली नाही. त्यामुळं त्याचं नामकरण 'एसटीआर-१' असं करण्यात आलंय.
पट्टेरी वाघांची संख्या झाली दोन : गतवर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एका पट्टेरी वाघाचं अस्तित्व आढळून आलं होतं. त्यानंतर आता नव्या वाघाचं आगमन झालं आहे. त्या नर वाघाचं छायाचित्र कॅमेऱ्यानं टीपलं आहे. विशेष म्हणजे या वाघाची ओळख पटली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यातून हा वाघ सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात आला आहे.
मुसळधार पावसातही कर्मचाऱ्यांचं लक्ष : सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पात २०१८ नंतर पाच वर्षांनी १७ डिसेंबर २०२३ रोजी प्रथमच पट्टेरी वाघाची नोंद झाली होती. त्या वाघाची ओळख न पटल्याने त्याचे नामकरण 'एसटीआर-१ असं करण्यात आलं होतं. दरम्यान, मागील वर्षभरात मुसळधार पावसातही व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी वाघाच्या हालचालींवर नजर ठेवली होती. त्यानुसार त्या वाघावं व्याघ्र प्रकल्पात अस्तित्व पुन्हा दिसून आलं होत.
नव्या वाघाचं आगमन झाल्याचं सिध्द : सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यानं २४ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी एका नर वाघाचं छायाचित्र टिपलं होतं. ते छायाचित्र 'एसटीआर-१' या वाघाचे नसून दुसऱ्या वाघाचं असल्याचं सिद्ध झालंय. हा वाघ राधानगरीमध्ये २०२२ साली कॅमेऱ्यात कैद झालेला वाघ असल्याचं सह्याद्री व्याघ्र भ्रमण मार्गातील वाघांवर अभ्यास करणाऱ्या संशोधक गिरीश पंजाबींनी सांगितलं आहे. त्यामुळे या नव्या वाघाचे नामकरण 'एसटीआर-२', असं करण्यात आलंय.
तिलारी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमणमार्गामधून 'एसटीआर-१' आणि 'एसटीआर-२' हे दोन्ही नर वाघ नैसर्गिकरित्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे हा भ्रमणमार्ग वाघांच्या संचारासाठी अनुकूल असल्याचं अधोरेखित झालं आहे. - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक
दोन वर्षांपासून राधानगरी अभयारण्यात वास्तव्य : नव्याने आगमन झालेल्या पट्टेरी वाघाचं शेवटचं छायाचित्र यंदाच्या उन्हाळ्यात १३ एप्रिल २०२४ रोजी टिपण्यात आलं होतं. त्यानंतर पावसाळ्यात साधारण १०० किलोमीटरचे अंतर कापून हा वाघ राधानगरी अभयारण्यातून सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पात (चांदोली राष्ट्रीय उद्यान) दाखल झाला आहे. हा नर वाघ अंदाजे सहा ते सात वर्षांचा असून मादीच्या शोधात तो चांदोलीत आल्याची शक्यता आहे. परंतु, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या मादी वाघाचं अस्तित्व नाही.