नाशिक : आज एक ओबीसी सर्वांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला झोप येत नाही. महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस ओबीसीमध्ये वाद लावत असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
काँग्रेस सरकार गेल्यावर ओबीसीला न्याय मिळाला - यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोप करत, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस एससी, एसटी, ओबीसी समाजाची एकता तोडून पाहात आहे. देशातील काँग्रेस सरकार गेल्यावर ओबीसीला न्याय मिळाला. जेव्हा ओबीसींची ताकद वाढली तेव्हा राज्या राज्यात काँग्रेसची दुकानं बंद होत गेली, असं म्हणत मोदींनी ओबीसी जातींमध्ये सुरू असलेल्या वादविवादाची यादी वाचून दाखवली. आज एक ओबीसी सर्वांच्या आशीर्वादाने देशाचा तिसऱ्यादा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला झोप लागत नाही, असं म्हणत हम एक हे तो सेफ हे अशीही नवीन घोषणा मोदींनी दिली.
छगन भुजबळ यांच्यावर ओबीसी कार्डचा आरोप - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या भूमिवर ओबीसी कार्ड खेळलं असतानाच येथील नेते छगन भुजबळ यांच्यावरही आरोपाची कथित बातमी गाजत आहे. या कथित वृत्तानुसार "मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या, मी उच्च जातीचा असतो तर त्यांनी मला असे वागवले नसते." असं भुजबळांनी म्हटल्याचं पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या '2024 द इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया' या पुस्तकात असल्याचं एका दैनिकात म्हटलं आहे. यावर छगन भुजबळ यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, "मी कुठलीच मुलाखत दिली नाही. छापून आलेल्या बातमीच खंडन करतो." तसंच संबंधित पुस्तक वाचून वकिलांशी चर्चा करून कारवाईचा विचार करणार असंही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी भुजबळांच्या संदर्भातील कथित विधान मात्र राजकारणाला वेगळी दिशा देणारं ठरू शकतं अशी चर्चा आहे.
ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही सत्तेत... - "महाराष्ट्राचे हित आणि विकासासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार माझ्यासह एकत्र आले. सर्वांनी पक्षप्रमुख अजित पवार यांना पत्र दिले. त्यानंतर आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालो. परिणामी, आज राज्यात कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. माझ्या एकट्या येवला मतदारसंघातच सुमारे दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. जनता त्यावर बेहद्द खुश आहे," अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच, ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झाल्याचा आरोप हा केवळ आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. "मला तुरुंगात जाण्याची कुठलीही भीती नाही. बातमीत जे काही प्रसिद्ध झालं तसं मी काहीही बोललेलो नाही. आम्ही विकासासाठीच सत्तेत सहभागी झालेलो आहोत. महाराष्ट्र सदन प्रकरणात न्यायालयाने मला क्लीन चीट दिलेली आहे. ते सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी मंत्रिमंडळात होतो, त्यावेळीच न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्यामुळे शंका घेण्याची किंवा संभ्रम होण्याची काहीही गरज नाही," असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा...