मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचं काउंटडाऊन सुरू झालंय. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं बघायला मिळतंय. त्यात महायुतीतही राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसनं नवाब मलिक यांना उमेदवारी दिल्यापासून महायुतीत धुसफूस सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात नवाब मलिक यांच्याशी संवाद साधला असता, आपली उमेदवारी महाविकास आघाडी तसंच महायुतीच्या विरोधात असल्याचं ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले नवाब मलिक? : 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधत असताना नवाब मलिक म्हणाले की, "भाजपा नेत्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आपण भाजपा नेत्यांच्या वक्तव्याकडं पूर्णतः दुर्लक्ष करत असून त्यांच्या वक्तव्यांना फारसं महत्त्व देत नाही. माझी उमेदवारी महाविकास आघाडी तसंच महायुतीच्या देखील विरोधात आहे. महायुतीच्या घटक पक्षांनी आमच्या विरोधात उमेदवार दिला असला तरी त्याचा फरक पडणार नाही", असं मलिक म्हणाले. तसंच आपल्याविरोधात महायुतीमधील भाजपा, शिवसेनेकडून काय प्रचार सुरु आहे, त्याकडं आपण दुर्लक्ष करत असल्याचंही ते म्हणाले.
मानखुर्द मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : "मानखुर्द मतदारसंघात आतापर्यंत केवळ भावनेच्या आधारावर राजकारण केलं गेलंय. या ठिकाणी अंमली पदार्थ खरेदी विक्रीचं मोठं जाळं पसरलंय. मात्र, त्याला भक्कम राजकीय आश्रय मिळालाय. त्यामुळं याठिकाणी अंमली पदार्थांचा विळखा आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपली प्राथमिकता राहील. या मतदारसंघातील जनतेला आता परिवर्तन हवंय. त्यामुळं जनता योग्य उमेदवाराच्या आणि योग्य संधीच्या शोधात होती. आपल्या माध्यमातून जनतेला विकासाभिमुख काम करणारा चांगला चेहरा मिळालाय. त्यामुळं मतदारांचा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. या मतदारसंघातील गुंडगिरी आणि अंमली पदार्थांचं जाळं आपण निश्चितपणं बाजूला सारुन विजयी होऊ," असा विश्वासही नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्यावरील आरोप बिनबुडाचे : आपल्यावर दाऊद इब्राहिम आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र, आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं मलिक म्हणालेत. "माझ्याविरोधात सातत्यानं जाणिवपूर्वक खोटेनाटे आरोप केले जात आहेत. आतापर्यंत झालं ते पुरे झालं. मात्र, यापुढं पुन्हा आरोप झाल्यास आरोप करणाऱ्यांविरोधात फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात येईल", असा इशारा मलिक यांनी दिला. दरम्यान, नवाब मलिक यांना उमेदवारी देण्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्णयावरुन महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या विरोधात भाजपा आणि शिवसेनाचा प्रचार सुरु आहे.
हेही वाचा -