महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीत मुसळधार पाऊस; इमारतीवर कोसळली वीज तर 14 वर्षाचा मुलगा गेला नाल्यात वाहून - Rain in Amravati

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 10:12 PM IST

Heavy Rain in Amravati : अमरावती शहरात दुपारी एक ते चार वाजेदरम्यान विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळल्यानं एका इमारतीवर वीज कोसळली. तसंच नाल्यालाही पूर आला आहे.

Heavy Rain in Amravati
अमरावतीत मुसळधार पाऊस (ETV Bharat Reporter)

अमरावती Heavy Rain in Amravati : अमरावती शहरात दुपारी एक ते चार वाजेदरम्यान विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळला. मुसळधार पाऊस बरसत असतानाच राजापेठ परिसरातील एका इमारतीवर वीज कोसळली. तसंच पावसामुळं नाल्याला पूर आल्यामुळं शहरातील लाल खडी परिसरात 14 वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेल्याची घटना घडलीय.

राजापेठ परिसरात कोसळली वीज : रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राजापेठ परिसरातील किडिया नगर स्थित एका चार मजली इमारतीच्या छतावर वीज कोसळली. वीज कोसळल्यामुळं छतावर असणाऱ्या कंपाउंड भिंतीला तडे गेले. इमारतीवर वीज कोसळल्यामुळं या इमारतीतील दोन तीन घरातील पंखे निकामी झाले. तसंच एका घरातील एलईडी टीव्ही विज कोसळल्यानं खराब झाला.

नाल्यात वाहून गेला मुलगा : मुसळधार पावसामुळं शहरातील लाल खडी परिसरात नाल्याला पूर आला. दरम्यान काही युवक नाल्यालगतच खेळत असताना चेंडू नाल्यात गेल्यानं तो काढण्यासाठी 14 वर्षाचा मुलगा नाल्यात गेला. मात्र नाल्यातून चेंडू काढण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा तोल गेला आणि तो नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला. नागपुरी गेट पोलीस पोलिसांसह महापालिकेचं बचाव पथक नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेत आहे.

आठवडाभर विदर्भात मुसळधार इशारा : मान्सूनची ट्रॅक रेषा सध्या दक्षिणेकडे झुकली आहे. झारखंड वर चक्राकार वारे वाहत आहेत. तर गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनची ट्रॅक रेषा पुढील काही दिवस दक्षिणेकडे झुकलेली राहणार आहे. त्यामुळं संपूर्ण विदर्भात आता आठवडाभर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाचे प्रमुख प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. शहापूर तालुक्यात पुराचं थैमान, पुरामध्ये अडकलेल्या दिडशेहून अधिक पर्यटकांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलं; शेकडो घरं पाण्याखाली - Heavy Rain in Thane
  2. मुंबईला ऑरेंज अलर्ट : राज्यात 'या' ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता - Orange Alert To Mumbai
  3. पंचगंगा नदी इशारा पातळी गाठायला 'इतके' फूट बाकी; तब्बल 38 बंधारे पाण्याखाली - Panchganga River

ABOUT THE AUTHOR

...view details