महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात पुराचा हाहाकार; चिचपल्लीतील मामा तलाव फुटल्यानं तीनशे घरात पाणी; रेड अलर्टमुळे शाळांना सुट्टी - Heavy Rain Hit To Chandrapur

Heavy Rain Hit To Chandrapur : मुसळधार पावसानं चंद्रपूर जिल्ह्याला चांगलंच झोडपून काढलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली या गावातील मामा तलाव फुटल्यानं तब्बल 300 घरात पाणी शिरलं. आज हवामान विभागानं चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली.

Heavy Rain Hit To Chandrapur
गावात शिरलेलं पुराचं पाणी (Report)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 7:23 AM IST

चंद्रपूर Heavy Rain Hit To Chandrapur : गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू पावसानं दाणादाण उडवली आहे. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं चिचपल्ली गावातील मामा तलाव फुटला. त्यामुळे तलावाचं पाणी तीनशे घरात शिरलं आहे. प्रशासनानं पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. इरई धरणाचे सातही दरवाजे दिड मीटरनं उघडण्यात आल्यानं रहेमतनगर, नगीनाबाग, सिस्टर कॅालनी यासह सखल वस्त्यात पाणी शिरलं आहे. रेहमतनगरातील 25 ते 30 नागरिकांना मनपाच्या शाळेत हलवण्यात आलं आहे. संततधार पावसानं जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत. शनिवार पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या नागभीड तालुक्यातील विलम या गावातील कुणाल प्रमोद बावणे या मुलाचा मृतदेह रविवारी मिळाला. दरम्यान, येत्या चोवीस तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केली आहे.

चिचपल्ली गावातील मामा तलाव फुटला :चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे चिचपल्ली गावातील मामा तलाव रविवारी फुटला. तलावाचं पाणी जवळपास तीनशे घरात शिरलं. तलावाच्या पाण्यात चाळीसहून अधिक जनावरं वाहून गेली. मामा तलाव फुटल्याची माहिती मिळताच प्रशासनानं चिचपल्ली गाव गाठून मदतकार्य सुरू केलं. इथल्या पन्नास नागरिकांचं स्थलांतर जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलं. इरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आल्यानं शहरातील रहेमतनगर, नगीनाबाग, सिस्टर कॅालनी यासह अन्य भागात पाणी शिरलं आहे. रेहमत नगर इथल्या 25 ते 30 नागरिकांना महात्मा ज्योतीबा फुले, महानगरपालिका शाळेत स्थानांतरण करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात अनेक घरांचं नुकसान झालं तर काही नागरिक पुरात अडकून पडले.

पुरात अडकलेल्या नागरिकांना काढलं सुरक्षित बाहेर :या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी तसेच पूरपीडितांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून स्थलांतरित केले. अजयपूर साज्यामधील नंदगुर गावातील शेतात अडकलेले विलास कुमरे, संगीता विलास कुमरे यांना सुरक्षितस्थळी पोहचवण्यात आलं आहे. कोठारी परिसरातील शेती पाण्याखाली आली आहे. अनेक परिसर जलमय झाले आहेत. तर, गडचांदूर, कवटाळा, भोयेगाव, चंद्रपूर रस्ता बंद करण्यात आला आहे.

सावली तालुक्यातील 12 मार्ग बंद :सावली तालुक्यात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. तालुक्याला जोडणारे जवळपास बारा मार्ग बंद झाले आहेत. त्यात सावली- चंद्रपूर, सावली- चारगाव, सावली- अंतरगाव, सावली- हरांबा, व्याहाड- कोंडेखल, सावली- पाथरी या मार्गांचा समावेश आहे. या तालुक्यात 16 घरांची अंशत: पडझड झाली. पडझड झालेल्या घरातील कुटुंबाला सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली आली आहेत. वली गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदी भरून वाहत आहे. नदीकाठावरील गावांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. संततधार पावसामुळे मूल तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी घुसलं. इथली उमा नदी आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदी, पावसाच्या पाण्यामुळे धान शेती पाण्याखाली आली. उमा, अंधारी नदीच्या पुलावरून पाणी असल्यानं मूलवरून जाणारे मार्ग बंद झाले आहेत. चंद्रपूर, सावली, गडचिरोली या मुख्य मार्गासह ग्रामीण भागातील मार्ग बंद झाले आहेत. मूल ते चंद्रपूर जाणाऱ्या मार्गावरील आगळीजवळील तलाव भरला आहे. रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद आहे. अंधारी नदीवरून पाणी वाहत असल्यामुळे पूर्ण वाहतूक बंद आहे. जानाळा ते सुशी जाणारा मार्गावरील चिरोली जवळील अंधारे नदी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग बंद आहे. मूल ते करवण काटवण जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात पाणी भरल्यानं मार्ग बंद आहे. मूल येथील रामपूर वॅार्डातील अनेक घरात पुराचं पाणी घुसलं आहे.

सिंदेवाही तालुक्यात पावसामुळे हाहाकार :सिंदेवाही तालुक्यात पावसामुळे 88 घरांचं नुकसान झालं आहे. सात गोठ्यांचंही नुकसान झालं. सिंदेवाही-कळमगाव, पळसगाव-देलनवाड़ी, वासेरा-गड़बोरी, सिंदेवाही-टेकरी, नवेगाव (लोनखैरी)-राजोली, राजोली-पेटगाव हे मार्ग बंद आहेत. तालुक्यातील जामसाळा गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली. तालुक्यात उमा नदी, बोकडोह नदीला पूर आला आहे. सिंदेवाही तालुक्यात शनिवारपर्यंत 140 मीमी पाऊस पडला. चिमूर गोसेखुर्द प्रकल्पानं भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था झाली. चिमूर तालुक्यात सिंचनाची सोय करण्यासाठी भिवापूर तालुक्यातून गोसेखुर्द धरणाचे पाणी आणण्यासाठी कालव्याचं बांधकाम करण्यात आलं. मात्र भिसी- जामगाव मार्गावरील कॅनल फुटले. यामुळे लगतच्या शेतातील पिकं वाहून गेली. गोसेखुर्द धरणाचे पाणी भिवापूर तालुक्यातून आणण्यासाठी कालव्याचं बांधकाम मंजूर झालं. हे काम कासवगतीने सुरू आहे. भिसी- जामगाव मार्गावर कालव्याचं बांधकाम सुरू आहे. शनिवारी झालेल्या जोरदार पावसानं तालुक्यातील नदी, नाले ओंसडून वाहत आहेत. भिसी - जामगाव मार्गावर असलेल्या कालव्यातही मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ वाढुण लोखंडी गेटवर कचऱ्याचे ढिगारे जमा झाले. गोसीखुर्द धरणाचे काँक्रिटसह पाळ फुटून वाहत गेली. यामुळे जामगाव इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.

राजुरा तालुक्यात मुसळधार पावसानं हाहाकार :ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी-मेंडकी रस्त्यालगत असलेल्या मामा तलावाची पाळ फुटली. यामुळे शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली आली. धानोलीपोहा या गावातही तलावाचं पाणी शिरलं आहे. भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावाकडं जाणारे रस्ते बंद झाले आहेत. या परिस्थितीनंतर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसानं परिसरातील अनेक ठिकाणी पिकं वाहून गेली आहेत.

मदतकार्य तातडीनं पोहोचवा - पालकमंत्री मुनगंटीवार : संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. अशात चंद्रपूर इथल्या चिचपल्ली गावातील तीनशे घरांमध्ये पाणी शिरल्याचं कळताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीनं मदतकार्य पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे 300 घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या गावातील नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करुन यासंदर्भात पहाटे 6.30 वाजता माहिती दिली. तातडीनं मदतकार्य मिळणं अपेक्षित असल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात आलं. सुधीर मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकाऱ्यांना मदतकार्य पोहोचवण्याचे निर्देश दिले. "चिचपल्ली गावाची प्रत्यक्ष पाहणी करा. तेथील नुकसानीचे पंचनामे करा. यासोबतच गावातील लोकांची तातडीनं जिल्हा परिषद शाळेत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करा," असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

पर्यटक अडकले रिसार्टमध्ये : पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना पुराचा फटका बसला. पुरात पर्यटक अडले. प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी बोटीच्या मदतीनं पर्यटकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. अंधारी नदीजवळ असलेल्या रिव्हर व्हू हॉटेलमधून भोला अग्रवाल (वय 26 रा झारखंड), बाजूच्या शेतामध्ये अडकलेले प्रकाश चांदेकर आणि कुटुंबातील इतर सदस्‍यांना सुरक्षितस्थळी पोहचवण्यात आलं आहे. अंधारी नदीजवळ असलेल्या ताडोबा अंधारी हॉटेलमधून आठ पर्यटक आणि कर्मचारी यांना पाण्याच्या वेढ्यातून बचाव पथकानं सुरक्षितस्थळी पोहचवलं आहे. अजयपूर साज्यातील पिंपळखुट इथं असलेल्या रेड अर्थ रिसॉर्टमधून मुंबई येथील दोन पर्यटक आणि तीन कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं.

हेही वाचा :

  1. नवी मुंबईत धबधब्यावर अडकलेल्या 60 हून पर्यटकांची सुटका; महापालिकेनं केलं 'हे' आवाहन - Navi Mumbai Rain
  2. गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला - Gadchiroli Rain
  3. सातारा जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'; कोयना धरणातील पाणीसाठा 'पन्नाशी' पार - Red Alert For Rain In Satara

ABOUT THE AUTHOR

...view details