मुंबई NCP party and symbol Hearing: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी याचिका दाखल केली होती. आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं उत्तर देण्यासाठी अजित पवार यांना दोन आठवड्यांचा अवधी दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. पाच-सहा सुनावणीनंतर या प्रकरणी निकाल लागण्याची शक्यता आव्हाड यांनी व्यक्त केली. आज ते मुंबईत पत्रकरांशी संवाद साधत होते.
राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कुणाचं? : या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणी 23 जुलै रोजी सुनावणी होणार होती. मात्र, शरद पवार यांच्या वकिलांनी न्यायमूर्तींना न्यायालयात प्रकरण लवकर निकाली काढण्याची विनंती केली. त्यानंतर मंगळवारी हे प्रकरण सुनावणीसाठी आलं. अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष तसंच चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षानं निवडणूक आयोगाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.