महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जीवघेण्या कर्करोगावर लस किती टक्के प्रभावी? भारतात कधी येणार? आरोग्यतज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती - RUSSIA CANCER VACCINE

कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर जगभरात उपचार शोधले जात आहेत. पण आता रशियानं कर्करोगावरील लस तयार केल्याचं सांगितलं जात आहे.

RUSSIA CANCER VACCINE
रशियाकडून कर्करोगावरील लसीची निर्मिती (Source - Getty Images)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2024, 7:17 PM IST

Updated : Dec 21, 2024, 2:23 PM IST

मुंबई : आरोग्य क्षेत्रातून एक महत्त्वाची आणि कर्करोगाच्या (कॅन्सर) रुग्णासांठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आजपर्यंत आरोग्य क्षेत्रात विज्ञानाकडून कर्करोगावर मात कशी करायची? किंवा या रोगाचं निदान कसं करायचं? यावर कोणतीही लस किंवा औषध आलं नव्हतं. मात्र, आता रशियानं कर्करोगाचं निदान करणाऱ्या लसीचं संशोधन केलं आहे. त्यामुळं ही लस आरोग्यक्षेत्रात क्रांती ठरणार असल्याचं बोललं जात आहे. कर्करोग बरा करणारी लस शोधून काढल्याचा दावा रशियानं केला आहे.

रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी कर्करोगावर लस तयार केल्याचं सांगितलं जात आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था 'TASS' नं ही माहिती दिली आहे. त्यामुळं कर्करोगावर खरोखरचं ही लस आली, तर विज्ञानात मोठी क्रांती आणि ऐतिहासिक घटना ठरणार आहे. पण अद्यापपर्यंत या लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मान्यता मिळाली नसल्याचं बोललं जात आहे. पण ही लस कर्करोगावर किती टक्के प्रभावी आहे? कर्करोगाच्या रुग्णांवर ही लस परिणामकार ठरणार का? जागतिक बाजारपेठेत ती कधी उपलब्ध होणार? आणि भारतात ही लस कधी येणार? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत.

डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली माहिती (Source - ETV Bharat Reporter)

लसीचा परिणाम कसा असणार? :जगभरात विविध घातक आणि जीवघेण्या रोगावर लस आणि औषधांचं संशोधन आणि निर्मिती करण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत कर्करोगासारख्या जीवघेण्या आणि प्राणघातक रोगावर लस किंवा औषधीनिर्मिती करण्यात संशोधकांना यश आलं नव्हतं. दरम्यान, कर्करोगावरील ही लस जागतिक बाजारपेठेत पुढील वर्षी म्हणजे 2025 पासून उपलब्ध होईल, असा दावा रशियानं केला आहे. जगातील कर्करोगावरील पहिली लस रशियाच्या वैज्ञानिकांनी MRNA तंत्रज्ञानावर विकसित केली आहे. कर्करोग झालेल्या रुग्णाच्या शरीरातील ट्युमर पेशींची वाढ आणि प्रमाण ती थांबवते आणि रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करते. या लशीचे प्री-क्लिनिकल चाचण्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. तसंच ही लस विकसित करताना रुग्णाच्या ट्युमरमधील अनुवंशिक माहिती वापरली जाणार असल्याचं रशियातील वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

लस किती टक्के प्रभावी? : कर्करोगावरील ही लस भारतात पुढील वर्षी 2025 साली येईल. ही लस कर्करोगाच्या रुग्णांसाठी परिणामकारक ठरेल, असा दावा रशियाच्या संशोधकांनी केला आहे. ही लस 80 टक्के प्रभावी आहे आणि रुग्णाच्या शरीरातील ट्युमर पेशी कमी करते. तसंच शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आहे, असं आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी म्हटलं आहे. कर्करोगावरील ही लस यशस्वी ठरल्यास आरोग्य क्षेत्रात क्रांती ठरेल आणि मानवासाठी हे एक मोठं वरदान ठरेल, असंही आरोग्यतज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता आगामी काळात या जीवघेण्या रोगावर लस येणार असल्यामुळं रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

AI च्या माध्यमातून लस तयार :"रशियानंतर अमेरिकेतही मेंदूच्या कर्करोगावर लस तयार करण्यात येत आहे. तर इंग्लडमध्येही लस तयार करण्याचं काम सुरू आहे. मात्र रशियातील लसीची प्राथमिक चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे ही लस कर्करोग होऊ नये, यासाठी बनवण्यात आली नसून ज्याला कर्करोग झाला आहे, त्याला बरं करण्यासाठी, त्यावर इलाज म्हणून ही लस तयार करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या मानवी शरीरातील रचना, ट्युमर आणि रोगप्रतिकार शक्ती या सर्वांचे विचार करून अर्ध्या तासाच्या आत ही लस (AI) आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे," अशी माहिती आरोग्यतज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. "भारतात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण प्रत्येक वर्षी आढळतात. 2023-24 मध्ये 15 लाख लोकांना कॅन्सर झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आरोग्य क्षेत्रात रशियातील ही लस आली तर ते एक वरदान ठरेल. ही लस सर्वांना मोफत देण्यात येईल, असं रशियानं म्हटलं आहे. परंतु ही लस भारतात येण्यास त्याला थोडे पैसे मोजावे लागतील. भारतात ही लस कधीपर्यंत येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे," असंही आरोग्यतज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा

  1. आता बाथरुममध्ये घसरून पडण्याची भीती नाही; 'हा' आहे सुरक्षित पर्याय
  2. आला हिवाळा तब्येत सांभाळा ; हिवाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी करा 'हे' उपाय, प्रकृती राहील ठणठणीत
  3. बदलत्या वातावरणामुळं लहान मुलांच्या आजारात वाढ, अशी घ्या काळजी
Last Updated : Dec 21, 2024, 2:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details