कोल्हापूर : भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षात बोलणी करण्यासाठी शरद पवार, अमित शाह, गौतम अदानी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात 5 वर्षापूर्वी बैठक पार पडली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. "अजित पवार जे बोलले ती वस्तुस्थिती आहे," असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कागल इथं हसन मुश्रीफ हे माध्यमांशी बोलत होते.
उद्योगपती गौतम अदानींसोबतची बैठक ही वस्तुस्थिती :विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील गत विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय नाट्याचा मोठा खुलासा केला आहे. विधानसभा निवडणूक 2019 नंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरू होता. या घडामोडी सुरू असताना एका बड्या उद्योगपतीच्या घरी झालेल्या बैठकीनंतर हा शपथविधी झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचा खुलासा आता अजित पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत केला. "भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यातील बोलणीला अमित शाह, शरद पवार, प्रफुल पटेल आणि उद्योगपती गौतम अदानी होते," असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी एका मुलाखतीत केला आहे. या घडामोडी घडताना उद्योगपती गौतम अदानींसोबत झालेली बैठक ही वस्तुस्थिती असल्याचा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी करत उपमुख्यमंत्री अजित पवारांची पाठराखण केली आहे.
बारामतीतील जनता अजित पवारांच्या पाठीशी :राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधात युगेंद्र पवार अशी लढत होत आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचारात पवार कुटुंबातील सदस्यांचा दुरावा असल्यानं अजित पवार एकटे पडले आहेत का, असा सवाल राज्यातील जनता करत आहे. मात्र अजित पवार जरी एकटे असले, तरी बारामतीची जनता त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे, असं मंत्री मुश्रीफ म्हणाले.