मुंबई-राज्यातील बहुप्रतिक्षित अशी पालकमंत्र्यांची ( guardian ministers of Maharashtra) यादी जाहीर करण्यास महायुती सरकारला शनिवारचा मुहूर्त लाभला. मात्र, पालकमंत्र्यांच्या यादीवरून राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. काही जिल्ह्यांत महायुतीमधील मतभेद समोर आले आहेत. तर काही जिल्ह्यातील राजकीय गणिते पालकमंत्री पदाच्या नियुक्तीनंतर बदलणार असल्याची चिन्हे आहेत.
रायगडमध्ये शिवसेनेत नाराजी-रायगडमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी शनिवारी रात्री मुंबई-गोवा महामार्ग रोखत निषेध व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आपल्याला पालकमंत्री नियुक्ती करावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती, असे गोगावले म्हणाले. मात्र, पालकमंत्री पदाबाबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात येणारा निर्णय मान्य असेल, असे गोगावले म्हणाले.
मराठा फॅक्टर नियंत्रणात येणार?भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलं आहे. मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या आंदोलनाचं जालना हे केंद्रबिंदू आहे. अशा जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या कार्यक्षेत्रात पंकजा मुंडे यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे फॅक्टरला नियंत्रणात आणण्यासाठी मुंडे यांना पालकमंत्री पद देण्यात आलं आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद नाहीबीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही. त्यांना दुसऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र, पालकमंत्री पदाच्या यादीतून धनंजय मुंडे यांना डावलण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आलं आहे.
पालकमंत्र्यांबरोबर सह पालकमंत्री नियुक्ती-पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये यावेळी प्रथमच सह पालकमंत्री पदाची देखील घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यासोबत मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिंदे यांच्याकडे मुंबई शहराच्या कार्यभार देण्यात आल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, मुंबई उपनगर जिल्ह्याचं पालकमंत्री पद भाजपाचे आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. या ठिकाणी सह पालकमंत्री पदी भाजपाचेच मंत्री मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या ठिकाणी आशिष जयस्वाल यांना सह पालकमंत्री पद देण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी प्रकाश आबिटकर यांची वर्णी लागली आहे. माधुरी मिसाळ यांना या ठिकाणी सह पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
यांचा पालकमंत्री यादीत समावेश नाही-शिवसेनेचे भरत गोगावले आणि दादा भुसे हे कॅबिनेट मंत्री तसेच योगेश कदम हे राज्यमंत्री हे पालकमंत्री पदापासून वंचित राहीले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आणि धनंजय मुंडे हे दोन मंत्री त्याचबरोबर राज्यमंत्री इंद्रनील नाईक या मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. तर, भाजपाच्या सर्व मंत्र्यांना पालकमंत्री अथा सह पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पालकमंत्री पद कशासाठी महत्त्वाचं-जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विभागाच्या विकासासाठी निधी वितरीत केला जातो. पालकमंत्री हा जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असल्यानं या पदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू होती. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. त्यामुळे पालकमंत्री पद हे राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेचंदेखील आहे.
हेही वाचा-
- अखेर पालकमंत्रिपदाला मिळाला मुहूर्त; मंत्र्यांनी दिली माहिती
- मंत्रिपदावरून महायुतीत नाराजी असतानाही आता पालकमंत्रिपदावरूनही रस्सीखेच, कोणाला हवे पालकमंत्रिपद?