अमरावती Paani Foundation Program: निसर्ग आणि बाजार भाव हे शेतकऱ्यांच्या हाती नसले तरी, उत्पन्नावर होणारा खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे शक्य आहे, हे गणित जमलं तर शेतकरी समृद्ध होऊ शकतो. विशेष म्हणजे "मेळघाटात आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती केली तर आदिवासी शेतकऱ्यांच्या दारी समृद्धी नांदू शकेल" असा संदेश देत गटशेती करण्याबाबत प्रेरणा देण्याचं काम पाणी फाउंडेशनच्या (Paani Foundation) वतीनं मेळघाटात केलं जात आहे. विशेष म्हणजे गत दोन-तीन वर्षांपासून पाणी फाउंडेशनचा उपक्रम यशस्वी होत आहे. यावर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी खास प्रशिक्षण घेऊन आता नव्या दमानं गटशेती करण्यासाठी तयारी सुरू केलीय.
शेतकऱ्यांना दिला जातो खास मान : शेतकरी समृद्ध व्हावा हा पाणी फाउंडेशनचा मुख्य उद्देश असून राज्यात एकूण 14 ठिकाणी सलग दोन महिने शेतकऱ्यांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील पाय विहीर या ठिकाणी असणाऱ्या प्रशिक्षण शिबिरात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका, वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका आणि मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आलंय. शेतकऱ्यांचे विविध गट पाडून प्रत्येकी अडीच दिवसांचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक प्रशिक्षणार्थी शेतकऱ्याचे पाय धूऊन आणि औक्षण करून त्यांचे प्रशिक्षण केंद्रात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था पाणी फाउंडेशनच्या वतीनं मोफत करण्यात आल्याची माहिती, पाणी फाउंडेशनचे चिखलदरा तालुक्याचे समन्वयक वैभव नायसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
गटशेती ही शेतकऱ्यांसाठी आनंददायी : शेतकरी म्हटलं की, कष्ट आणि दुःख असं चित्र उभं केलं जातं. अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण फार गंभीर आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना गटशेतीच्या माध्यमातून समृद्ध करण्याचा पाणी फाउंडेशनचा प्रयत्न आहे. या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिलांना आपण जणू माहेरी चाललो आहोत असं वाटत होतं. एकूणच ही चळवळ शेतकऱ्यांचे आयुष्य पालटणारी आहे असं, पाणी फाउंडेशनचे तांत्रिक प्रशिक्षक सतीश अंभोरे यांनी सांगितलंय.