मुंबईRahul Shewale : आज देशभरात राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज अयोध्येच्या श्रीराम मंदिरात अभिमंत्रित केलेल्या धनुष्यबाणासह महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर पोहोचले. प्रभू श्रीरामाचे अयोध्येत मंदिर उभारण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्यावर यंदाची ही पहिलीच रामनवमी आहे. म्हणून रामनवमीच्या दिवशी मी स्मृतिस्थळावर येऊन नतमस्तक झालो. अशा शब्दात राहुल शेवाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी आमदार सदा सरवणकर, शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, विभागप्रमुख अविनाश राणे, नगरसेवक समाधान सरवणकर आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
अभिमंत्रित धनुष्यबाण बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर :अयोध्येतील तपस्वी छावनीचे पीठाधिश्वर जगतगुरु परमहंस आचार्य यांच्या निमंत्रणावरून रामनवमीच्या पूर्वसंध्येला राहुल शेवाळे अयोध्येत दाखल झाले. मंगळवारी संध्याकाळी राहुल शेवाळे अयोध्येच्या राम मंदिरात दर्शनासाठी गेले असता तेथील संत महंतांनी मंदिरात अभिमंत्रित केलेला धनुष्यबाण त्यांना सुपूर्द करत विजयासाठी आशीर्वाद दिला. हा धनुष्यबाण घेऊन राहुल शेवाळे रामनवमीच्या दिवशी मुंबईत दाखल झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी ते आले. यावेळी त्यांनी अयोध्येतील धनुष्यबाण या स्मृतिस्थळावर ठेवून बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि रामनवमी साजरी केली. यानंतर राहुल शेवाळे यांनी वडाळा येथील राम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले.