शिर्डी Shirdi International Airport : ग्रामपंचायतचा कर थकवल्यानं शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मल्हारवाडी ग्रामपंचायतनं ही मालमत्ता जप्तीची नोटीस (Shirdi Airport Tax Due) बजावली. वारंवार कराची मागणी करुनही शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्राधिकरणानं रक्कम भरली नाही. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 129 प्रमाणं शिर्डी विमानतळास जंगम मालमत्ता जप्ती वारंट जारी करण्यात आलं. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडं ग्रामपंचायतचा 8 कोटी 30 लाख रुपयाचा कर थकीत आहे.
साडेआठ कोटी रुपये कर थकीत : "काकडी ग्रामपंचायतीची शिर्डी विमानतळाकडं तब्बल साडेआठ कोटी रुपयांची कराची रक्कम थकीत आहे. यासाठी सातत्यानं पाठपुरावा करुनही ती रक्कम मिळत नसल्यानं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही कारवाई करण्यात आली," अशी माहिती सरपंच पुर्वा गुंजाळ यांनी दिली.
कोणत्या नियमात दिली नोटीस? :पत्रात म्हटलं आहे की, करबाकी भरण्याबाबत सातत्यानं पत्रं दिली आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये अंतिम पत्र दिलं होतं. 24 मार्च 2024 रोजी हुकूम नोटीस, 129 प्रमाणे दिलेली करवसुली नोटीस, राष्ट्रीय लोकअदालत नोटीस अशा अनेक नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. तसंच ग्रामपंचायतीचा मासिक सभा ठराव घेवूनही कर भरणा केलेला नाही. त्यामुळं आपल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडं असलेली थकीत कराची वसुली करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 124 व कलम 129 अन्वये मिळकतीप्रमाणे मागणी बिलं, नोटीस, रिट हुकूम, लोकअदालत वॉरंट बजावले आहे.