मुंबई Governor On Maharashtra Day : आज महाराष्ट्र दिन हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी विशेष आणि खास आहे. मराठी माणसाला नवी स्वतंत्र ओळख मिळाली तो दिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होते. त्याचा कारभार ब्रिटिश सरकारच्या हाती होता. स्वातंत्र्यानंतर राज्यांच्या पुनर्रचनेचं नवं आव्हान देशासमोर उभं राहिलं. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' या मागणीसाठी महाराष्ट्रात लढा उभारला. यात 106 क्रांतिकाऱ्यांनी हुतात्मं पत्करलं आणि त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क इथं राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
महाराष्ट्र संतांची भूमी : शिवाजी पार्क येथील महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुंबई पोलीस, अग्निशमन दल, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा बल या जवानांच्या पथकांचं संचलन यावेळी पार पडलं. त्यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्याचा इतिहास, कर्तुत्व आणि देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचं योगदान उलगडून सांगितलं. ते म्हणाले, "महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. नेहमीच नवीन स्वीकारणारी आणि विकासाची भूमी आहे. त्यामुळंच अनेक उद्योजकांचं महाराष्ट्र हे प्रमुख आकर्षण राहिलंय."