महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जीवनात न डगमगता कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने कार्य करा, पदवीप्रदान समारंभात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे प्रतिपादन - Graduation Ceremony - GRADUATION CEREMONY

Graduation Ceremony : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (Governor CP Radhakrishnan) यांच्या उपस्थितीत प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचा 18 वा पदवीप्रदान समारंभ पार पडला. पदवीप्रदान समारंभात ९ स्नातकांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आलं.

Graduation Ceremony
पदवीदान समारंभ (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2024, 10:48 PM IST

अहमदनगर (लोणी) Graduation Ceremony :राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (Governor CP Radhakrishnan) यांच्या उपस्थितीत प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ झाला. यावेळी जीवनात अनेक समस्यांना सामोरे जाताना न डगमगता आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास यश संपादन करता येईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं. प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या 18 व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, संस्थेचे विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, मोनिका सावंत, ध्रुव विखे पाटील, कुलसचिव डॉ. अरुण कुमार व्यास आदी उपस्थित होते.


स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका : स्नातकांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन राज्यपाल म्हणाले, अनेक महापुरुषांच्या जीवनात आव्हानाचे प्रसंग आलेत, त्यांनी आत्मविश्वासाने त्यावर मात करून उद्दिष्ट गाठले. स्नातकांनी सेवा भावनेने कार्य करताना स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नये. आपल्या यशासाठी आई-वडिलांनी परिश्रम घेतले आहेत हे न विसरता त्यांच्याविषयी कायम श्रद्धा मनात बाळगावी, असं आवाहन त्यांनी केलं.


विद्यापीठाचं कार्य मार्गदर्शक : राधाकृष्णन पुढे म्हणाले, लोणीसारख्या ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी आणि समर्पित कार्याच्या बळावर प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठासारखी संस्था उभी राहू शकते, हे संस्थेसाठी झटणाऱ्या दिवंगत विठ्ठलराव विखे पाटील आणि दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केलं आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचं विद्यापीठाचं कार्य इतरांना मार्गदर्शक आहे.



विद्यापीठाचं केलं कौतुक : वर्षभरात दहा लाख नागरिकांना उपचार देण्याचं संस्थेचं कार्यदेखील उल्लेखनीय आहे. सामान्य कुटुंबीयातून आलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण विद्यापीठात देण्यात येतं. सेवाभावनेनं काम करणारे डॉक्टर्स येथून तयार होतात. विद्यापीठाने रुग्णांवर उपचार करण्यासाठी बहुशाखीय दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि अवयव प्रत्यारोपणसारख्या सुविधा इथे उभारण्यात येत आहेत. संस्थेची प्रगती खरोखर कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल म्हणाले.



ऑनलाईन भूमिपूजन : राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रवरा विशेषोपचार रुग्णालय आणि अवयव प्रत्यारोपण केंद्राचं ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आलं. त्यांच्या हस्ते पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आलं. पदवीप्रदान समारंभात ९ स्नातकांना पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आलं. ९४९ पदवी आणि पदव्युत्तर स्नातकांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात दीक्षांत संचलनाने झाली.

हेही वाचा -

Viral Video : टीसाइड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कोल्हापुरातील चिमुकलीने वडिलांना दिल्या खास शुभेच्छा; व्हिडिओ होतोय व्हायरल

शरद पवार अन् नितीन गडकरींकडून खूप काही शिकण्यासारखे - राज्यपाल

'आयडॉल'चा सुवर्णमहोत्सवी पदवीदान समारंभ; उदय सामंत यांची उपस्थिती

ABOUT THE AUTHOR

...view details