मुंबई-मायापुरीतील नायर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा (GBS patient death in Mumbai) जीबीएस सिंड्रोम विषाणुमुळे मृत्यू झाला. हा रुग्ण वडाळा परिसरातील रहिवासी होता.
जीबीएसमुळे मृत्यू झालेला रुग्ण मुंबई महानगरपालिकेतील बीएन देसाई रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करत होता. नायर रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण बऱ्याच काळापासून आजारी होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. जीबीएसची लागण असलेली एक अल्पवयीन मुलगीदेखील नायर रुग्णालयात दाखल आहे. ही मुलगी पालघरची असून दहावीची विद्यार्थिनी आहे.
२० जण व्हेंटिलेटरवर -आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागात जीबीएसचे आणखी पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील जीबीएस रुग्णांची संख्या १९७ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागात नवीन आढळलेल्या पाच रुग्णांमध्ये दोन नवीन रुग्ण आहेत. तर मागील दिवसातील तीन रुग्णांचा समावेश आहे. १९७ रुग्णांपैकी १७२ रुग्णांना जीबीएस आजार झाल्याचं निदान झालं आहे. किमान ४० रुग्ण हे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. तर ९२ रुग्ण पीएमसीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. २९ रुग्ण हे पिंपरी चिंचवड नागरी हद्दीतील आहेत. तर २८ पुणे ग्रामीणमधील आहेत. १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ५० रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. २० जण व्हेंटिलेटरवर आहेत.