अमरावती :सभोवताली घनदाट आरण्य, घनदाट अरण्यात जंगली श्वापदांची भीती अन् आता काळीज गोठवणारी कडाक्याची थंडी... मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही गाविलगडाच्या पायथ्याशी असणारे गवळी बांधव आपल्या जनावरांच्या चाऱ्यासाठी भल्या पहाटे गडावर जाऊन गवत आणतात. गाविलगड परिसरात असलेल्या तीन गावातील गवळी बांधव पहाटेच गवताचा भारा आणून आपल्या दुभत्या जनावरांची भूक भागवतात. दिवस उजाडताच पाच ते सात किमी अंतर गाठून गवत कापून त्या गवताचा गठ्ठा घेऊन परत गावात आणणं वाटतं तितकं सोपं नाही. मात्र तरीही गवळी बांधव गाविलगड चढून पुन्हा गवत कापून त्याचा गठ्ठा डोक्यावर ठेवून परत गावात येण्याची कसरत सलग तीन ते चार वेळा करतात. किल्ल्यालगत असणाऱ्या एक नव्हे, तर तीन गावातील गवळी बांधवांच्या या रोजच्या मरणयातनांबाबत "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.
जंगलात गुरांना चराईसाठी बंदी :मेळघाटातील जंगल हे व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असल्यानं जंगलात गाई-म्हशींना चराईसाठी बंदी आहे. मेळघाटात अनेक गावात गवळी बांधव हे आपल्या जनावरांना गावालगत असणाऱ्या जंगलात चराईसाठी घेऊन जातात. गाविलगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पांढरी, लवादा, आलडोह या तीन गावातील गवळी बांधवांना आपल्या जनावरांसाठी गाविलगड किल्ल्यावर मुबलक चारा उपलब्ध आहे. त्यामुळे या गावातील महिला, पुरुष सकाळी दिवस उजडताच किल्ल्यावर चढून मोठया प्रमाणात असणारं गवत कापून आणतात. अडीचशेच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या लवादा गावात तीनशेच्या आसपास जनावरं आहेत. लवादा गावतही ही परिस्थिती आणि तीनशे लोकवस्ती असणाऱ्या आलडोह गावात साडेतीनशेच्या वर जनावरं आहेत, अशी माहिती आलडोह येथील रहिवासी नारायण येवले यांनी दिली.
गवतासाठी चढावा लागतो मेळघाटातील गाविलगडचा किल्ला (Reporter) गवळी बांधवांचा असा आहे दिनक्रम :मेळघाटातील सर्वच गावातील राहिवाशांच्या दिवसाची सुरुवात पहाटे पक्षांच्या किलबिलाटाच्या साथीने होते. गविलगडालगत असणाऱ्या पांढरी, लवादा आणि आलडोह गावगील गवळी बांधव रोज पहाटे चार वाजता उठतात. पहाटे चार वाजल्यापासून दिवस उजाडेपर्यंत शेण काढणं, सडा टाकणं ही कामं महिला आटपतात, तर पुरुष मंडळी गाई-म्हशींचं दूध काढून ते परतावड्याला पाठवण्याची व्यवस्था करतात. पुरुष मंडळी सकाळी दूध विक्री करत असताना घरातील तरुण आणि महिलांची मात्र गडावर चढून चारा कापून आणण्यासाठी लगबग सुरू होते. पहाटे गवत आणल्यावर दुपारी चूल पेटवायला लाकडं आणायला जंगलात जावं लागते, असं पांढरी गावातील रहिवासी लक्ष्मी येवले "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हणाल्या.
उन्हाळ्यात गवळी बांधवांचं स्थलांतर :गाविलगड किल्ल्यावरून पावसाळ्यात हिरवंगार आणि हिवाळ्यात सुकलेलं गवत गवळी बांधव आपल्या जनावरांसाठी आणतात. आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत गडावर गवत उपलब्ध असतं. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात गवताची कमतरता असते. शिवाय गाविलगड परिसरासह मेळघाटात सर्वत्र कोरडा दुष्काळ असल्यानं गवळी बांधव आपलं घर, गाव सोडून मेळघाट बाहेर मैदानी भागात स्थलांतरित होतात. एकूणच आपल्या जनावरांसाठी गवळी बांधव संपूर्ण आयुष्यच समर्पित करतात.
हेही वाचा :
- जीवन वाचविणारे पाणीच ठरतेय मृत्यूला आमंत्रण: मेळघाटातील गामस्थांना मूत्रपिंडाचे आजार, अनेकांचे मृत्यू - Amravati water issue
- मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार
- वन्य प्राण्यांसह चोरट्यांपासून बचावासाठी मेळघाटात होतोय 'हा' आगळावेगळा प्रयोग