मुंबई Ganpat Gaikwad Firing Case :शिवसेना (शिंदे गटाचे) कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मागील आठवड्यात गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आता याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे.
आरोपी गणपत गायकवाडसह त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज (सोमवारी) शिवसेनेच्या सात मंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मंत्री दादा भुसे, संदिपान भूमरे, दिपक केसरकर, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संजय राठोड या मंत्र्यांचा समावेश आहे.
शिस्तभंगाची कारवाई व्हावी : भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी शिवेसनेच्या सात मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे साथीदार यांच्यावर कठोर कारवाई करावी तसंच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या भेटीनंतर हे प्रकरण भाजपाला चांगलंच जड जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. परंतु सात मंत्र्यांच्या या भेटीनंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर कोणती कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.