छत्रपती संभाजीनगर Bappa Paint on Postcard: "देवा बलात्कार म्हणजे काय मला माहीत नाही मात्र, तसे करणाऱ्याला शिक्षा कर" असा संदेश एका लहान चिमुकलीनं चक्क लाडक्या गणपती बाप्पाला पाठवला आहे. कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे पोस्टकार्डवर बाप्पाचं चित्र रेखाटून दुसऱ्या बाजूने देवाला संदेश पाठवा अशी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये आलेले संदेश थक्क करणारे आहेत.
प्रतिक्रिया देताना संस्थापक विलास कोरडे (ETV BHARAT Reporter) पत्र लिहून संदेश : इंटरनेटच्या युगात जग अगदी गतिमान झालं आहे. कोणालाही संपर्क करणं, त्यांची विचारपूस करणं, संदेश पाठवणं अगदी सोपं झालं आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी हे खूप अवघड होतं. परंतु त्याकाळी पोस्टकार्डद्वारे पत्र लिहून संदेश पोहचवला जायचा. त्याची माहिती आजच्या पिढीला नाही. त्यामुळंच पोस्टकार्डवर बाप्पाचं चित्र रेखाटून संदेश पाठवा अशी अनोखी स्पर्धा घेण्यात आली.
पोस्टकार्डाबाबत माहिती देण्यासाठी उपक्रम :छत्रपती संभाजीनगर विभागातील पोस्ट ऑफिसमध्ये सध्या पोस्टकार्ड घेण्यासाठी चांगलीच गर्दी होत आहे. त्याचं कारण आहे सिडको येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेली स्पर्धा. "पोस्टकार्डवर गणेश काढा अन् पत्र लिहा" अशी बाप्पाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात आतापर्यंत ४००० विद्यार्थी, महिला, वृध्द यांनी पत्र पाठवलं आहे. यात छत्रपती संभाजीनगरसह जालना, पुणे, सातारा, परभणी, जिल्ह्यातून उपक्रमास प्रतिसाद मिळाला आहे. आजच्या इंटरनेटच्या युगात पोस्टामार्फत पाठवण्यात येणारे पत्र, आंतरदेशीय पत्र कमी झाले आहेत. त्यामुळं आजच्या पिढीला पोस्टकार्ड कळावे याकरिता हा उपक्रम घेण्यात आल्याची माहिती, कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी दिली.
मुलींनी नोंदवला सर्वाधिक सहभाग: पोस्टकार्डवर एका बाजूला बाप्पाचं चित्र काढून दुसऱ्या बाजूला देवाकडं आपली इच्छा किंवा विनंती व्यक्त करणारा संदेश देण्याची स्पर्धा घोषित होताच, बहुतांश पत्रं मुली आणि महिलांनी लिहिली आहेत. त्यामध्ये आजच्या परिस्थितीबाबत गणपती बाप्पाकडं चिंता आणि रोष व्यक्त करणारे संदेश देण्यात आले आहेत.
महिला अत्याचाराला वाचा फोडणारे संदेश : एका आठ वर्षीय मुलीनं "देवा मला बलात्कार म्हणजे काय माहीत नाही, मात्र जे ऐकू येते त्यावरून जो कोणी ते करत असेल त्याला कठोर शिक्षा कर" असं पत्रात लिहलं आहे. तर दुसऱ्या एका मुलीनं "बाप्पा धन दौलत कमी दे, मात्र मुलींच्या अब्रूची हमी दे" अशी विनंती केली. असे अनेक संदेश महिला अत्याचाराला वाचा फोडणारे बाप्पाकडं पाठवण्यात आले आहेत. काही मुलांनी शेतकऱ्यांना सुख समृध्दी देण्याचं साकडं घातलं आहे. तर "देवा माझी मैत्रीण माझ्या घराच्या बाजूला राहात होती, आता ती दुसरीकडं राहाते. प्लीज तिला परत इकडं राहायला पाठव" असाही गंमतीशीर संदेश पत्रात देण्यात आला आहे.
चित्र आणि संदेश गाडीवर लावले : इयत्ता पहिली ते कॉलेजपर्यंत तसंच ७० वर्ष वय असलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. या पत्रांमधून ७०० गणेश पत्रं गाडीवर सजवण्यात आली असून शहरभर ही "आपल्या बाप्पाची गाडी" फिरवण्यात येत आहे. ही गाडी पाहण्यासाठी शाळकरी मुले आणि भक्त गर्दी करत आहेत. लुप्त होत असलेल्या पोस्टकार्डबाबत त्यांना ही माहिती मिळत आहे. तसंच उर्वरित गणेश कार्ड्सचे कार्यालयात 'गणेश प्रदर्शन' सर्व भक्तांना दहा दिवस पाहता येणार असल्याची माहिती, कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी दिली.
हेही वाचा -
- गणेशोत्सव २०२४ : पिंपळाच्या खोडात "सृष्टीविनायक"; अमरावतीच्या श्रीकृष्ण पेठेत गणरायाचं अनोखं रूप - Srishtivinayak
- तब्बल 50 हजार 1 बटनाची गणेश मूर्ती; हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाची मनमोहक सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी - Ganeshotsav 2024
- लालबागमधील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी...; दोन गाड्यांची झाली चोरी - Lalbaugcha Raja