नाशिक Ganesh Visarjan 2024 :शहरातील वाकडी बारव इथून दुपारी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचं पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजन करुन सुरुवात करण्यात आली. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी स्वत: ढोलवादनाचा आनंद घेतला. या मिरवणुकीत मानाच्या मंडळांसह 20 हुन अधिक मंडळांचा सहभाग आहे. मिरवणूक बघण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली. मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. यावेळी कलावंतांनी केलेलं तांडव नृत्य पाहण्यास नागरिकांची मोठी गर्दी झाली.
विसर्जन मिरवणूक मार्ग :विसर्जन मिरवणूक वाकडी बारव इथून सुरुवात झाल्यानंतर दादासाहेब फाळके मार्ग -महात्मा फुले मार्केट- दूधबाजार चौक- बादशाही लॉज कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-मेनरोड- धुमाळ पॉइंट- सांगली बँक सिग्नल-महात्मा गांधी रोड- मेहर सिग्नल-अशोकस्तंभ- नवीन तांबट गल्ली- रविवार कारंजा-होळकर पूल-मालेगाव स्टँड-पंचवटी कारंजा-मालविय चौक- परशुराम पुरियामार्ग- कपालेश्वर मंदिर-भाजी बाजार-म्हसोबा पटांगण हा मिरवणुकीचा मार्ग आहे. मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच भद्रकाली परिसरातील गल्लीमध्ये देखील बॅरिकेटींग करण्यात आलं आहे. अतिसंवेदनशील समजला जाणारा खडकाळी सिग्नल परिसरात स्ट्रॅायकिंग फोर्स तैनात करण्यात आला आहे. गणेश मिरवणुकीत लेझर, गुलाल आणि डीजे नसावा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मात्र तरी काही मंडळामध्ये डीजे वाजवण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक शहरात विसर्जनासाठी तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.