गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) :गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव जवळ रविवारी दोन दिवसात दोन मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दोन दिवसात घडलेल्या या दोन घटनेमुळं गंगापूर पोलिसांसमोर तपासाचं आव्हान उभं राहिलं होतं. पोलिसांनी तपासाची चक्रं जलद गतीनं फिरवत खून केलेल्या आरोपींना बारा तासाच्या आत शोधून काढलं आहे. अमोल शिवनाथ उघडे (वय १७ वर्षे) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर महेश रमेश माटे (वय २० वर्षे), किशोर रमेश बर्डे (वय २३ वर्षे) अशी आरोपीची नावं आहेत. तर दुसऱ्या घटनेत शिवना नदीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नसून या प्रकरणी गंगापूर पोलिसांचा तपास सुरू आहे.
मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा आरोपींचा प्रयत्न : सारंगपूर शेत शिवारात पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला होता. या माहितीवरुन सदर घटनास्थळी वरीष्ठ अधिकारी स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी पाहणी केली. त्यावेळी एक पुरूष जातीचे शरीर त्याचा चेहरा आणि इतर अवयव जाळून त्याची हत्या केली होती. मृतदेहाच्या कपड्यात पाकीट आढळून आले होते. त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड मिळून आले. तसंच मृतदेहावर महेश रमेश माटे याच्या अंगावरील कपडे घातलेले आढळून आले. यावरून सदरचा मृत देह हा महेश रमेश माटेचा (रा. वझर ता. गंगापूर) असल्याचं प्राथमिक तपासामध्ये आढळून आलं. मृतदेहाबाबत सखोल चौकशी केली असता, मृतदेह हा महेश रमेश माटेचा नसून अमोल शिवनाथ उघडे (वय 17 वर्ष रा. कदीम शहापूर ता. गंगापूर) याचा असल्याचं समजलं.
पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे: घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाणे येथील अधिकारी यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी सतीश वाघ यांच्या नेतृत्वाखाली सपोनि पवन इंगळे आणि पोलीस अंमलदार तसंच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळया तीन टीम तयार करून तपास केला. मृतकाची संपूर्ण माहिती घेऊन, मृतकाचे मित्र, जाण्या येण्याच्या जागा, व्यवसाय, कामधंदा करण्याच्या जागा, नातेवाईक यांची चौकशी केली. मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन, मयत अमोल शिवानाथ उघडे हा महेश रमेश माटेचा मित्र असून तो दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा घराबाहेर गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नसल्याची पोलिसांना माहिती मिळाली.