मुंबई Mumbai Crime News :मरीन ड्राईव्ह येथील एका घटनेत दोन अज्ञात व्यक्तींनी नरिमन पॉइंट येथे असलेल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यांकडे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कर्मचारी असल्याचं सांगून कॉलवरून पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. या प्रकरणी राहुल नार्वेकर यांचे स्वीय सहाय्यक शिवांश आशिष सिंग यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार दाखल केली असता एका आरोपीला अटक केल्याची माहिती, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिलीय.
काय आहे प्रकरण : शिवांश आशिष सिंह यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. टूर्स अँड ट्रॅव्हल कार्यालयाशी संबंधित असलेल्या नंदिता बेदी यांना कार्यालयातील कर्मचारी श्रेयशने कॉल अल्याची माहिती दिली. नंदिता बेदी यांनी यावेळी पैशाबाबत केलेल्या मागणीला विरोध केला.
आरोपीविरूध्द गुन्हा दाखल : शिवांश सिंह यांनी तातडीने या घटनेची माहिती राहुल नार्वेकर यांना दिली. नंतर नार्वेकर यांनी पोलीस तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. परिणामी, मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 34, 385 (खंडणी) आणि 417 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणी दादर (पूर्व) येथील रहिवासी असलेल्या जयेश उत्तम जाधव या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिली होती.
जातमुचलक्यावर आरोपीची सुटका :आज आरोपी जयेश जाधवला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीची सुटका झाली असल्याची माहिती, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी दिलीय. त्याचप्रमाणं दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस करत आहेत.
हेही वाचा -
- "हा तर देशातील सर्वात मोठा फ्रॉड", राहुल नार्वेकरांवर संजय राऊतांचा हल्लाबोल
- 'आम्ही उद्धव ठाकरेंसोबत'; राजन साळवी यांच्यावरील कारवाईवर वैभव नाईक, विनायक राऊत यांची प्रतिक्रिया
- 'माकडाच्या हाती कोलित दिलं'; पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांच्या निवडीवर विरोधक पडले तुटून