मुंबई Fraud Passport : पासपोर्ट बनवण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी डी बी मार्ग पोलिसांनी एका मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यातील आरोप असलेल्या मुलीनं फिरोजबाद महापालिका यांच्याकडून मिळालेलं जन्म प्रमाणपत्र तिनं तिच्या मामाकडून मिळवला होता. त्या जन्म दाखल्याचा वापर ती पासपोर्ट मिळवण्यासाठी करत होती. पासपोर्ट पडताळणीदरम्यान ही माहिती समोर आली होती. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आणि डी बी मार्ग पोलीस ठाण्यात तरुणी विरोधात एफआयआर नोंदवण्यात आलीय.
भारतीय असल्याचं प्रमाणपत्र मागितल्यानं प्रकार समोर : डी बी मार्ग पोलिसांच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, तरुणीनं दीपांशी राजेंद्र शर्मा यांच्यामार्फत पासपोर्टसाठी अर्ज केला होता. तो डी बी मार्ग पोलिसांकडे तपासासाठी आला होता. बीआयटी अधिकाऱ्यामार्फत त्यांना कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं. 10 ऑक्टोबर 2023 रोजी मुलगी तिच्या सर्व कागदपत्रांसह डी बी मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलीस ठाण्यात तिच्याकडे तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं भारतीय नागरिक असल्याचं प्रमाणपत्र मागितलं होतं. मात्र, भारतीय नागरिक असल्याचं प्रमाणपत्र तिच्याकडं सापडलं नाही. यानंतर तिथं उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यानं मुलीला तिच्या जन्म प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. त्यानंतर त्या प्रमाणपत्रावर असलेला QR कोड जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या वेबसाइटवर नेण्याऐवजी काहीतरी वेगळेच दाखवत होता. तेव्हा मुलीनं सांगितलं की, तिच्या काकांनी ते बनवून पाठवलं होतं.