मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालंय. महायुतीने राज्यभरात अनेक महत्त्वाकांक्षी आणि कल्याणकारी योजना राबवल्यामुळे जनतेने महायुतीला कौल दिला असल्याचं बोलले जातंय. एकीकडे निवडणुकापूर्वी राज्यभर महायुतीच्या विरोधात वातावरण होतं आणि निकाल महायुतीच्या विरोधात जाईल, अशी चर्चा होती. मात्र जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलंय. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची आणि एकनाथ शिंदे अन् अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. पण अजून मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. खरं तर 40 मंत्रिपद बाकी असताना महायुतीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळतेय. तसेच अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचे चित्र आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 10 मंत्रिपदं मिळणार असल्याची चर्चा आहे आणि यात इच्छुक मात्र मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कोणाला किती मंत्रिपदं द्यायची? हा खरा प्रश्न एकनाथ शिंदेंच्या समोर आहे. मात्र मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांना नाराज न करता मंत्रिपदाचा वेगळाच फॉर्म्युला एकनाथ शिंदेंनी काढला असून, इच्छुकांच्या मंत्रिपदावर एकनाथ शिंदेंनी वेगळा तोडगा काढल्याचे बोललं जातंय.
अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला : एकीकडे महायुतीतील मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबर रोजी होणार असल्याची दाट शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, महायुतीत 40 मंत्रिपद आहेत. त्यात भाजपाला सर्वाधिक 13 ते 15 मंत्रिपद मिळणार आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेला आठ ते दहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा ते सात मंत्रिपद मिळणार अशी चर्चा आहे. गेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक होते. शेवटपर्यंत मंत्रिपदासाठी ते आस लावून बसले होते. परंतु त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे मागील वेळी ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांना यावेळी मंत्रिपद मिळणार असल्याचं शिवसेनेच्या गोटात चर्चा आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि नवीन आमदार हे मंत्रिपदासाठी इच्छुक असून, केवळ दहा मंत्रिपदं मिळणार तर दुसरीकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. त्यामुळे कोणालाही नाराज करायचे नाही म्हणून यावर एकनाथ शिंदेंनी एक वेगळाच तोडगा काढलाय. शिवसेना पक्षात अडीच-अडीच वर्षं मंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला एकनाथ शिंदे यांनी अवलंबला असल्याचं बोललं जातंय. कोणालाही नाराज करायचं नाही, त्यामुळे अडीच-अडीच वर्षं इच्छुकांना मंत्रिपद देऊन त्यांना शांत करण्याची रणनीती सध्या एकनाथ शिंदेंनी आखली असल्याचं बोललं जातंय.
आमचे सर्वस्वी निर्णय प्रमुख नेते एकनाथ शिंदे घेणार : शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची गर्दी असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडीच वर्षांनंतर खांदेपालट करणार असून, नवीन चेहऱ्याला संधी देणार आहेत. परिणामी नाराज आहेत, त्यावर तोडगा म्हणून अडीच वर्षाचा फॉर्म्युला वापरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आमदार संजय शिरसाट यांना असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार असो किंवा कोणाला मंत्रिपद द्यायचे किंवा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला हे सर्वस्वी निर्णय आमचे प्रमुख नेते एकनाथ नेते घेतील. तसेच महायुतीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मंत्रिपदाबाबत निर्णय घेतील. मंत्रिमंडळ विस्तार या प्रक्रियेत कुठलाही आमदार किंवा नेता सहभागी होणार नाही. सर्वस्वी प्रमुख नेते निर्णय घेतील. तसेच आम्हाला किती कॅबिनेट मंत्री मिळणार आहेत? किंवा राज्य मंत्रिपद मिळणार हे आताच काही सांगता येणार नाही. परंतु लवकरच मंत्रिमंडळ विस्तार झाल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलीय.