मुंबई Sanjay Pandey On Parambir Singh :राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम हळूहळू वाजू लागत असतानाच उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनीदेखील वर्सोवा मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांचे खंडन संजय पांडे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना केलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी सुरू केलीय. या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'शी बोलत असताना संजय पांडे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले संजय पांडे? :यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना संजय पांडे म्हणाले की, "आपण निवडून दिलेल्या उमेदवाराच्या भेटीसाठी मतदारांना काही तास रांगेत उभं राहावं लागतं. तसं न होता आमचं पारदर्शक काम असेल. ज्या जनतेनं आम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिलं, त्या जनतेसाठी आम्ही पाच वर्षांसाठी त्यांच्यासोबत राहून काम करणार आहोत. माझ्या घराचं दार सदैव मतदारांसाठी खुलं असणार आहे. माझा फोननंबरदेखील सर्वांना देण्यात येईल." " मी पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त असतानादेखील नागरिकांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना माझा नंबर दिला होता. तेव्हाही मी सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचो," असंही संजय पांडे यांनी सांगितलं.