छत्रपती संभाजीनगरLOK SABHA ELECTIONS 2024 :ठाकरे गटाची पहिली यादी बुधवारी जाहीर करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघावरूनसंभ्रम निर्माण झाला होता. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. उमेदवारी कोणाला दिली तरी पक्षाचं काम करणार अशी भूमिका चंद्रकांत खैरे यांच्यासह विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली होती. यावेळी पहिल्यांदाच भाजपाशिवाय ठाकरे गट लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. यावेळी खैरे यांच्याकडं ना भाजपाची साथ आहे, ना बाळासाहेबांच्या पक्षाचं नाव ना चिन्ह. त्यामुळं मतांची जुळवाजुळव करणं खैरेंसह ठाकरे गटासमोर आव्हान असणार आहे.
खैरे सहाव्यांदा लोकसभा उमेदवार :शिवसेना पक्षाचे कट्टर सैनिक म्हणून चंद्रकांत खैरे प्रचलित नेते आहेत. सलग सहाव्यांदा त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी सलग चारवेळा त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळालाय. मात्र, 2019 मध्ये त्यांना संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सहाव्यांदा मिळालेली उमेदवारी त्यांना पुन्हा विजय देणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. चंद्रकांत खैरे 1990 तसंच 1995 काळात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून विधानसभेचे आमदार होते. 1995 ते 1999 काळात ते राज्यात कॅबिनेट मंत्री होते. तसंच 1999, 2004, 2009, 2014 साली त्यांनी सलग चारवेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या काळात त्यांनी शिवसेना पक्षात आपली स्वतःची जागा निर्माण केली आहे. पक्षाचं नेतेपद त्यांच्याकडं असून संघटन उभं करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. एकनाथ शिंदे फुटले त्यावेळी खैरे त्यांच्यासोबत जातील अशी चर्चा होती. मात्र त्यांनी ठाकरे कुटुंबासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. आजही ठाकरे गटाचे विश्वस्त म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं.
भाजपाशिवाय लढणार निवडणूक :शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपा नेते प्रमोद महाजन तसंच गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा तसंच शिवसेना या दोन हिंदूवादी संघटनांना एकत्र आणून नवीन समीकरण राज्यात घडवलं होतं. त्यात शिवसेनेचा वाटा नेहमीच मोठा होता. गेल्या 30 वर्षांपासून दोन्ही पक्ष एकत्र मिळून लोकसभा निवडणूक लढवत होते. त्यामुळं कट्टर हिंदुत्ववादी मतं शिवसेनेच्या पारड्यात पडत होती. त्यामुळंच सलग वीस वर्ष खैरे यांना खासदार म्हणून संधी मिळाली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळं शिवसेनेसह भाजपाची मतं विभागली जाणार आहेत. त्यामुळं यंदा खैरे यांच्याकडं ना भाजपची साथ आहे, ना बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह, अशा परिस्थितीत ठाकरे गट म्हणून मतदारांसमोर जाऊन मतं मिळवणं आव्हानात्मक होणार आहे.
पक्षांतर्गत विरोध :ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा लोकसभा उमेदवारी मिळणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसात पाहायला मिळाली. मात्र, त्याचबरोबर त्यांना अंतर्गत विरोध देखील असल्याचं अनेकवेळा स्पष्ट झालं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पक्षाकडं उमेदवारी मागितली होती. त्यावरून ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. इतकच नाही, तर अंबादास दानवे शिंदे गटात जाऊन उमेदवारी मिळवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असताना दानवे यांनी त्याचं खंडण केलं आहे. खैरे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यावर त्यांचं काम करू, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र त्यांच्या नाराजीबाबत पक्षांतर्गत चांगलीच चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे उपशहर प्रमुख बंडू ओक यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार, असं त्यांनी जाहीर करत आपला प्रचार देखील सुरू केला आहे. त्यातच एकनाथ शिंदे गटाला ही जागा सुटल्यास शिवसेनेची मतं विभागण्याची भीती देखील त्यांच्यासमोर आहे. 2024 ची निवडणूक खैर यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. कारण पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत नसणार आहे. यात आता ठाकरे गट कोणते मुद्दे घेऊन प्रचार करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे वाचलंत का :
- महाविकास आघाडी राहिली 'वंचित', प्रकाश आंबेडकर यांनी ८ जागांवरील उमेदवारांची केली घोषणा - Prakash Ambedkar news
- प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले 'आता आम्हाला सत्तेत जायचंय'; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप होणार? - Manoj Jarange Patil
- अंबानींकडून 15 कोटींची देणगी घेतल्याचे आरोप भगतसिंग कोश्यारींनी फेटाळले, आरटीआय कार्यकर्त्यांविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल करणार - Bhagat Singh Koshyari