नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. नरखेड येथील सांगता सभा संपून अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा- भिष्णूर मार्गानं परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली, असा देशमुखांचा आरोप आहे. दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या हल्ल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नागपूर येथील रुग्णालयात उपचार : अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचाराचासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर देशमुख यांना पुढील उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपानं चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली.
स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून दगडफेक :भाजपानं ही 'स्टंटबाजी' असल्याचा आरोप केलाय. "स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली," असा आरोप भाजपाचे नेते अविनाश ठाकरे यांनी केला. "निवडणुकीत सलील देशमुख हे पराभूत होणार आहेत, याची अनिल देशमुख यांना जाणीव आहे. त्यामुळं सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून घडवून आणलेला हा स्टंट आहे. याचा आम्ही निषेध करतो," असं म्हणत भाजपानं आरोप फेटाळले आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानं केला होता.