ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत संत गाडगेबाबा भातसई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. 109 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. यात 46 मुलींचा तसंच 70 मुलांचा समावेश आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
भातसई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा दुपारच्या जेवणातून विषबाधा :प्राप्त माहितीनुसार, शहापूर तालुक्यात भातसई नावाची आश्रमशाळा आहे. या शाळेत परिसरातील 350 आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आश्रमशाळेत वाशिंद परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरी श्राद्ध असल्यानं त्यांनी आज या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण दिलं होतं. त्यातील 100 विद्यार्थांना जेवणानंतर उलट्या, जुलाब, मळमळ सुरू झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार कोमल ठाकूर, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी, आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर :या आश्रमशाळेत 350 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी 100 विद्यार्थ्यांना जेवणासाठी गुलाबजाम तसंच पुलाव देण्यात आला होता. तेव्हा जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. सुरुवातीला 20 ते 25 विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, जुलाब, मळमळ होऊ लागल्यानं या विद्यार्थ्यांना तातडीनं शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू असून विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
दोषींवर कारवाई करण्याची मागणी :आदिवासी विकास प्रकल्पासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त होऊनही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गावातील अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात जेवण दिल्याची चर्चा रुग्णालयात सुरू होती. याला अद्याप कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यानं दुजोरा दिलेला नाही. मात्र पुलाव, गुलाबजामचं जेवण बाहेरून आणलं होते, अशी माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली. या प्रश्नावर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनांनी केली आहे.
हे वाचलंत का :
- राज्यसभेच्या 6 जागांवर कुणाची लागणार वर्णी? उद्धव ठाकरे, शरद पवार गटाला फटका
- मराठवाड्याच्या दुष्काळी भागात फुलली स्ट्रॉबेरीची शेती, शेतकऱ्यांना होतोय आर्थिक लाभ
- महायुतीच्या नेत्यावर मोदींचा विश्वास नाही; नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली