ठाणे :भिवंडी शहरातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनानं एक कोटी 85 लाख रुपयांचा साठा जप्त केला असून ही औषधं अँटिबायोटिक (प्रतिजैविक) आहेत. या प्रकरणी औषध प्रशासन विभागाकडून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. आंतरराज्यीय टोळी यामध्ये सहभागी असून त्यादिशेनं अन्न व औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नारपोली येथील गोदामामध्ये बनावट औषधसाठा : भिवंडीमधील नारपोली येथील गोदामामध्ये बनावट औषधांचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या औषधांचा साठा विक्रीस प्रतिबंधित केला. या औषधांचे नमुने तपासल्यानंतर ते बनावट आढळून आले. त्यानंतर पथकानं एक कोटी 85 लाख रुपयांच्या बनावट औषधांचा साठा जप्त केला. याप्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.