अमरावती : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात सावंगा विठोबा गावात कृष्णाजी अवधूत महाराजांच्या मंदिरासमोर हजारो वर्षांपासून उभ्या असणाऱ्या 73 फुटांच्या दोन खांबांवर झेंडे चढविण्यात आले. विशेष म्हणजे इतक्या उंच खांबांवर झेंडे चढवताना झेंडे चढविणाऱ्या व्यक्तीचे पाय या दोन्ही खांबांना लागणार नाही, याची काळजी घेतली जाते. दोन्ही खांबांवरची जुनी खोळ काढून त्यावर नवीन खोळ चढविण्यात येते. हा झेंडे चढविण्याचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
असा आहे इतिहास: यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना विठोबा सावंगा संस्थानचे सचिव अशोक सोनवाल म्हणाले की, "साधारण 400 ते 500 वर्षांपूर्वी कृष्णाजी महाराज हे सावंगा या गावातील उखंडराव चतुर यांच्या घरी वास्तव्यास आले होते. कृष्णाजी महाराज यांच्या अंगी असणाऱ्या दैवी बाबींची जाणीव उखंडराव चतुर यांना झाली. चतुर यांच्या पाच मुलांसोबत कृष्णाजी महाराज हे राहत होते. कृष्णाजी महाराज यांनी त्यावेळी सांगितलेल्या सामाजिक सुधारणाविषयक माहिती उखंडराव चतुर यांचा मुलगा कुणाजी महाराज यांनी गायनास्वरूपात पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली. अंधश्रद्धेविरुद्ध असणारा कृष्णाजी महाराज यांचा संदेश भजन स्वरूपात मांडण्यात आला. आज देखील कृष्णाजी महाराज यांचा संदेश देणारी भजन अवधुती भजन म्हणून प्रसिद्ध आहेत. कृष्णाजी महाराज यांनी जाती मुक्त असा नवा संप्रदाय निर्माण केला. या संप्रदायाला चतुरप्रतीय संप्रदाय असं म्हटलं जातं."
अवधूत महाराजांचं समाधीस्थान : विठोबा सावंगा या गावात तटबंदी वाड्याच्या आत अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर आहे. या मंदिरात कुठलीही मूर्ति नाही. मात्र, कृष्णाजी महाराजांची समाधी या ठिकाणी आहे. या मंदिरात शेकडो वर्षांपासून अखंड ज्योत तेवत आहे. कृष्णाजी महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला डोक्यावर रुमाल बांधावा लागतो किंवा टोपी घालावी लागते. मंदिरात अवधुती भजन सकाळ आणि सायंकाळी गायलं जातं. कृष्णाजी अवधूत महाराज नवसाला पावतात तसंच या ठिकाणी सर्व मनोकामना पूर्ण होते. यासह मानसिक रुग्ण बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.