पुणे Nirmala Sitaraman : हैदराबाद विद्यापीठात पीएचडीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी रोहित वेमुला यानं 2016 साली आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येनंतर विद्यापीठासह देशभर सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाची फाईल आता बंद केली असून सर्व आरोपींना क्लीन चीट दिलीय. तसंच रोहित वेमुला हा दलित नसल्याचं देखील पोलिसांनी म्हटलंय. आत्ता याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केलीय. विशेष सम्पर्क अभियान अंतर्गत पंतप्रधानांच्या विकसित भारत संकल्पनेमधील शिक्षण आणि शिक्षकांचं योगदान या विषयावर पुण्यातील डेक्कन कॉलेज इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण विशेष शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी त्यांनी टीका केलीय.
विरोधकांनी ही घटना रस्त्यावर ओढून आणली : यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "हे प्रकरण विद्यापीठ पातळीवर अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळता आलं असतं. पण मोहब्बत की दुकान उघडणाऱ्या लोकांनी हा मुद्दा संसदेतही नेला." तसंच ती एक दुर्दैवी घटना असून विद्यापीठाला अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळू न देता विरोधकांनी रस्त्यावर ओढून आणली. देश आणि सरकारच्या विरोधात एक कथन रचलं गेलं, अशी टीका निर्मला सीतारामन यांनी केलीय.