मुंबईTheaters History In Mumbai : मुंबईत सध्या विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आलं असून, अनेक इमारती हटवण्यात आल्या आहेत. बरेचसे मार्ग बदलण्यात आले असून त्या जागी नवे उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. तसंही सतत बदलणार आणि धावपळीचे शहर अशी मुंबईची ओळख आहेच. मात्र, या सतत होणाऱ्या बदलात आणि धावपळीत मुंबईतल्या अनेक जुन्या आणि महत्त्वपूर्ण गोष्टी काळाच्या पडद्याआड जात आहेत. त्यापैकीच आहेत चित्रपटांमध्ये चित्रित केलेले मुंबईतील अनेक बंगले आणि हॉटेल्स. या ठिकाणांचं जतन व्हावं आणि मुंबईतील चित्रपट सृष्टीचा इतिहास लोकांना कळावा, यासाठी पालिकेच्या कौशल्य विकास विभागानं आता पुढाकार घेतला असून, मुंबईत 'फिल्म हेरिटेज मॅप' (Film Heritage Map Program) लावण्याच्या विचारात पालिका करत आहे.
मुंबईत 'फिल्म हेरिटेज मॅप' लावण्यात येणार: या संदर्भात पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, मुंबईला चित्रपटसृष्टीचा अनेक वर्षांचा इतिहास आहे. हा इतिहास मुंबईकरांना समजावा यासाठी मुंबईत 'फिल्म हेरिटेज मॅप' लावण्यात येणार आहे. यात क्यूआर कोड सुविधा देखील देण्यात येईल. जेणेकरून मुंबईकरांना कोड स्कॅन केल्यावर संबंधित जागेच्या माहितीसह, तिथे कोणता चित्रपट चित्रित झाला होता, कोणत्या वर्षी चित्रित झाला? त्यामध्ये कलाकार कोण होते? दिग्दर्शक दिग्दर्शक कोण होते? यासह इतंभुत माहिती मुंबईकरांना उपलब्ध व्हावी यासाठी पालिका हा उपक्रम राबवत आहे. पुढच्या अंदाजे दोन ते तीन महिन्यात याचं काम पूर्ण होईल.
कशी झाली चित्रपटसृष्टीची सुरुवात : ब्रिटिश काळात मुंबईत जी काही काम करण्यात आली, उद्योग उभारण्यात आले त्यापैकीच एक चित्रपट सृष्टी. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली. ही इंडस्ट्री अगदी थोड्याच दिवसात नावारुपाला आली. त्यामुळं चित्रीकरणासाठी नवनवीन लोकेशन, सेट आणि सीनची निर्मात्यांना, दिग्दर्शकांना गरज भासू लागली. या गरजेतून मुंबईत अनेक स्टुडिओ उभारण्यात आले. यासह मुंबईतील अनेक रस्त्यांवर, समुद्र किनारे, हॉटेल, बंगले, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी चित्रपटांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली. त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणे प्रकाश झोतात आली आणि पुढे मुंबईची ओळख बनली.