छत्रपती संभाजीनगर: निवडणूक आली की, अनेक नेतेमंडळी कुंडलीच्या आधारावर आपली राजकीय गणितं आखण्यास सुरुवात करतात. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तसाच अनुभव येत असल्याचं पाहायला मिळत आहे. शहरातील ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राशींच्या अनुषंगानं अर्ज कधी करावा याबाबत माहिती दिली. पक्ष-उमेदवार कार्यालय कधी सुरू करावं, अर्ज भरणं कोणत्या दिवशी लाभदायी राहील याबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवस अनेक उमेदवारांनी ज्योतिष आणि पुरोहितांची वेळ आरक्षित करून ठेवल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 'ई टीव्ही भारत' अंधश्रद्धेच्या विरोधात असली तरी ज्योतिष्यावर विश्वास असणाऱ्या वाचकांसाठी हा वृत्तांत.
उमेदवारांसाठी कोणता दिवस असू शकतो चांगला? : निवडणुकीत अनेक उमेदवार देवाचा धावा करतात. ज्योतिषाकडं राजकीय कारकीर्द नशिबी आहे का? याचा वेध घेतात. आपल्या राशीनुसार चांगला दिवस कोणता याबाबत इच्छुक उमेदवार ज्योतिषाचार्य यांच्याकडं विचारणा करतात. त्यानुसार संभाजीनगर येथील ज्योतिषाचार्य वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी यांनी राशी नुसार चांगले दिवस सुचवले आहेत.
- मिथुन, सिंह आणि कुंभ या राशींसाठी २२ आणि २३ ऑक्टोबर
- कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशींसाठी २४ आणि २५ ऑक्टोबर
- सिंह, तुळ, मेष आणि धनु या राशींसाठी २६ आणि २७ ऑक्टोबर
- कन्या, वृषभ, वृश्चिक आणि मकर या राशींसाठी २८ आणि २९ ऑक्टोबर हे लाभदायी असणार आहेत.
सर्वांसाठी चांगला दिवस : आता इच्छुक उमेदवारांनी ठराविक दिवशी अर्ज केल्यास इच्छापूर्ती होण्याची शक्यता असते. तर २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग असल्यानं हा दिवस सर्वांसाठी चांगला आहे. या दिवशी प्रचार कार्यालय सुरू करू शकतात असं पांडव गुरुजी यांनी सांगितलं.