पुणे Vijay Kumbhar on Pooja Khedkar :परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत नवनवीन खुलाशांना पेव फुटत आहे. आता पूजा खेडकर यांना देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या बाबत यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचं धोरण प्रशासनानं स्वीकारलं आहे, असा आरोप विजय कुंभार यांनी केला. पूजा खेडकर यांना मदत करणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असं पत्र सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना दिलं आहे.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात सुरवातीपासून सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार हे लढा देत आहेत. पूजा खेडकरशी निगडीत अनेक प्रकरणं त्यांनी समोर आणले आहेत. आता पूजा खेडकर यांच्या प्रकरणात पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून त्यांना देण्यात आलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबाबत जे गुन्हेगार असतील, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असं पत्र त्यांनी लिहिलं आहे.
एकाच दिवशी दोन रुग्णालयात अर्ज :या पत्रात कुंभार यांनी म्हटलं आहे की, पूजा खेडकर यांनी एकाच दिवशी म्हणजे २३ ऑगस्ट २०२३ रोजी दोन अर्ज केले. एक यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि दुसरा औंध जिल्हा रुग्णालयाकडं दाखल केला आहे. या दोन्ही ठिकाणी त्यांनी पुराव्यादाखल आपला वास्तव्याचा पत्ता वेगवेगळा दिला आहे. औंध रुग्णालयाकडं अर्ज करताना औंधचा पत्ता दिला, तर यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडं तळवडे या गावाचा पत्ता दिला असल्याचं समोर आलं आहे. औंध रुग्णालयात त्यांनी आधार कार्ड जोडलं होतं. तर यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडं राशन कार्ड जोडलं आहे. एकाच कारणासाठी दोन वेगवेगळे अर्ज वेगवेगळ्या ठिकाणी करणं, इथंच त्यांची गुन्हा करण्याची प्रवृत्ती दिसून आली आहे. अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ओळखीचा परता म्हणून फोटो आयडी जोडावा लागतो. तो जोडलेला नसतानाही त्यांना ते प्रमाणपत्र कसं देण्यात आलं ? असा सवाल यावेळी कुंभार यांनी केला आहे.