मुंबई : राज्यात बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. भेसळयुक्त दुधामुळं जनतेच्या आरोग्यावर परिणाम होतोय. या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थांवर तसंच भेसळयुक्त मुंबईत येणाऱ्या दुधावर चाप बसवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय. मागील दोन दिवसात मुंबईत येणाऱ्या 98 दुधाच्या टँकरची तपासणी करण्यात आली. यात दुधाचा दर्जा कमी आढळलेल्या वाहनाला परत पाठवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलीय.
98 वाहनांची तपासणी : दुधात होत असलेल्या भेसळीच्या तक्रारी वाढत असल्यानं प्रशासनानं बुधवारी (12 फेब्रुवारी) आणि गुरुवारी (13 फेब्रुवारी) पहाटे मुंबईच्या चार चेक नाक्यांवर अचानक जाऊन मुंबईत येणार्या दुधाच्या टँकरची तपासणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी या कारवाई संदर्भात माहिती दिली. "आम्ही गेल्या दोन दिवसात मुंबई बाहेरील येणाऱ्या 98 दुधाच्या टँकरची तपासणी केलीय. यात 96 लाख 6 हजार 832 किंमतीच्या 1 लाख 83 हजार 397 दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही आहे," असं झिरवाळ यांनी सांगितलं.
'या' ठिकाणी करण्यात आली तपासणी? :नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील विविध भागात अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मुंबई बाहेरुन येणार दूध हे शुद्ध दूध आहे की भेसळयुक्त? याची तपासणी करण्यात आली. यासाठी मुंबईतील मुलुंड चेक नाका, मानखुर्द चेक नाका, दहिसर चेक नाका, ऐरोली चेक नाका या सर्व ठिकाणी मिळून 98 दुधाच्या टँकरची तपासणी केली. यामध्ये गाईचे दूध, पॉश्चराईज्ड होमोजेनाईज्ड डोन्ड दूध आणि डबल डोन्ड दूध या दुधाचा समावेश होता. दरम्यान, मानखुर्द येथे तपासणी करण्यात आलेल्या एका वाहनात दुधाच्या दर्जात कमतरता आढळून आल्यानं या वाहनाला परत पाठवण्यात आले. तर आगामी काळातही दूध, दही किंवा अन्य पदार्थांमध्ये कोणतीही भेसळ आढळली तर ती अन्न व औषध प्रशासन विभाग खपवून घेणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही झिरवाळ यांनी यावेळी दिला.
हेही वाचा -
- पैशासाठी जीवाशी खेळ! जिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकून जप्त केली ५० लाखांची भेसळयुक्त दूध पावडर - Milk powder seized in Ashti
- सावधान! बाजारात बनावट पनीर; अशी ओळखा भेसळ - How To Identify Fake Paneer
- Sonipat Crime News : भेसळयुक्त गव्हाचे पीठ खाल्ल्याने एकाचा मृत्यू, अनेकांची तब्बेत बिघडली