नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. मात्र, त्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कॉंग्रेस नेत्यांकडून ईव्हीएमवर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलय.
नेमकं काय म्हणाले राजीव कुमार? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राजीव कुमार म्हणाले, "मतदानात सहभागी होऊन लोक प्रश्नांची उत्तरं देतात. ईव्हीएमचा प्रश्न असेल, तर ती 100 टक्के फूलप्रूफ आहेत. जर आरोप कराणाऱ्यांनी आज पुन्हा प्रश्न उपस्थित केले तर आम्ही पुन्हा त्यांना हेच उत्तर देऊ."
पेजर हॅकचं उदाहरण देत काँग्रेस नेत्यानं केले होते आरोप :यापूर्वी काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी इस्रायलनं दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचे पेजर हॅक केल्याचं उदाहरण देत ईव्हीएममध्ये हेराफेरी होऊ शकते असा दावा केला होता. रशीद अल्वी म्हणाले होते, "महाराष्ट्रातील विरोधकांनी ईव्हीएमऐवजी कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा आग्रह धरला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील भाजपा सरकार आणि निवडणूक आयोग काहीही करू शकतात. इस्रायलनं पेजर आणि वॉकीटॉकी वापरून लोकांना मारायला सुरुवात केलीय. ईव्हीएमद्वारे अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे जिंकण्यासाठी भाजपा निवडणुकीपूर्वी काहीही करू शकते."
हरियाणा निवडणुकीबाबत लेखी तक्रार :गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ECI ला एक निवेदन सादर केलं. ज्यात ते म्हणाले होते की, त्यांना आशा आहे की संस्था या समस्येची दखल घेईल आणि योग्य सूचना देईल. तर कॉंग्रेसचे संपर्क प्रभारी सरचिटणीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलंय, "9 ऑक्टोबर रोजी, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक आयोगाकडं तक्रारींनी भरलेलं निवेदन सादर केलं. यामध्ये हरियाणातील 20 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेतील गंभीर आणि स्पष्ट अनियमितता अधोरेखित करण्यात आल्यात. आम्ही आशा करतो की निवडणूक आयोग याची दखल घेईल आणि योग्य निर्देश देईल."
हेही वाचा -
- महाराष्ट्रासह झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचा वाजणार बिगुल, दुपारी निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक होणार जाहीर