मुंबई- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कुणीही दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाई होणार आहे. यामध्ये हयगय करायची नाही, असा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला होता. पोलीस, सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी सुरू आहे. ही निर्घृण हत्या असून, माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
आरोपीला अजिबात थारा दिला जाणार नाही : या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाचा असला, विरोधा पक्षाचा असला, त्रयस्थ असला, राजकारणातील असला तरी कारवाई होणार, त्याला अजिबात थारा दिला जाणार नाही, याची ग्वाही अजित पवार यांनी दिली. बीडमध्ये पाठवण्यात आलेला पोलीस अधीक्षक कडक असून, त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.
19 जानेवारी पूर्वी पालकमंत्रिपदाचा निर्णय :संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री सतत स्वतः लक्ष घालत आहेत. मुख्यमंत्री सुरुवातीपासूनच सांगत आहेत की, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. एक महिना झाला असल्याने त्यांचे कुटुंबीय काळजीत आहेत. न्यायाधीशांमार्फत चौकशी सुरू आहे, आरोपी तो कोणीही असो, कारवाई केली जाणार आहे. शाहू, फुले आणि आंबेडकरांनी मानवतेची शिकवण दिलीय. आरोपी कोणीही असो पण कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, असंही अजित पवार म्हणालेत. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी उद्या येत आहेत. आज मुख्यमंत्री पानिपतमध्ये आहेत. मी 19 जानेवारी रोजी दावोसला जात आहे. त्यापूर्वी पालकमंत्रिपदाचा निर्णय होईल, असंही ते म्हणालेत.
पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला विलंब : पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाला काहीसा वेळ लागला हे खरे आहे. बुधवारी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. ते आमदारांशी संवाद साधणार आहेत. दावोसला ते 19 जानेवारीला जातील. त्यापूर्वी पालकमंत्रिपदाची जबाबदारी मुख्यमंत्री जाहीर करतील, असंही अजित पवारांनी सांगितलंय. आपल्या आजूबाजूला कोण आहे, कसे वागतात, कसे बोलतात, लोकांशी कसे संबंध ठेवतात याचे भान आपल्यासहित सर्वांनी बाळगण्याची गरज आहे. चुकीच्या व्यक्ती असल्या तर त्यांना बाजूला सारले पाहिजे, असंही अजित पवारांनी बोलून दाखवलं.
हेही वाचा -