मुंबई Pragyanand Saraswati Interview : द्वारका शारदा पीठ आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती हे सध्या मुंबईत आहेत. श्रावण काळात मुंबईत थांबून ते साधना आणि आराधना करत आहेत. मुंबईत आलेल्या शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती यांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'नं शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना प्रज्ञानंद सरस्वती यांनी चातुर्मास आणि श्रावण काळात आराधना आणि उपासना केली पाहिजे. या काळात भक्तिमय आणि अध्यात्मिक वातावरण असतं. अनेक सण-उत्सवही याच काळात येत असतात. त्यामुळं या काळात मोठ्या प्रमाणात आराधना आणि साधना करावी, असं त्यांनी सांगितलं.
बांगलादेशींना देशात थारा देणं चुकीचं :मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारासंदर्भात विचारण्यात असता प्रज्ञानंद सरस्वती म्हणाले की, "कोणताही हिंसाचार हा वाईटच असतो. सध्यात देशात असलेलं सरकार हे हिंदुत्वाचं रक्षण करणारं सरकार आहे. मात्र, त्याचवेळी आपण बांगलादेशातील हिंसाचार, अस्वस्थता आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि नुकतीच घडलेली अत्याचाराची घटना याकडं देखील लक्ष दिलं पाहिजे. या घटनादेखील अत्यंत हृदयद्रावक आणि लज्जास्पद आहेत. बांगलादेशी घुसखोर आणि रोहिग्यांना या देशात थारा देणं चुकीचं आहे. कारण, हे लोक इथं येतात. आधार कार्ड तयार करतात आणि आपल्या देशातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात." "ज्याप्रमाणे आपण कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाकतो, त्याप्रमाणे यांनी आपण टाकलेल्या तुकड्यावर जगावं. त्यापेक्षा जास्त अपेक्षा करू नये," असं खळबळजनक वक्तव्य शंकराचार्यांनी केलं.