महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेची पहिली यादी जाहीर: अमित ठाकरे vs सदा सरवणकर लढत, जाणून कोणत्या मतदार संघातून कोण मैदानात - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी गुवाहाटी इथं कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. दुसरीकडं शिवसेनेनं विधानसभा निवडणूक 2024 साठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Maharashtra Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2024, 6:29 AM IST

Updated : Oct 23, 2024, 6:47 AM IST

मुंबई :विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्यापही बैठकांचं सत्र सुरू आहे. तर दुसरीकडं भाजपानं जाहीर केलेल्या पहिल्या यादीनंतर आता महायुतीतील दुसरा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनं देखील आपली 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. कोकणात मात्र, सामंत बंधूंना जॅकपोट लागल्याचं चित्र आहे. उदय सामंत यांना रत्नागिरीमधून तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माहीम विधानसभा मतदार संघातून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याविरोधात सदा सरवणकर यांची लढत होणार आहे.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर (Reporter)

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर :याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत रत्नागिरीतून उदय सामंत तर राजापूर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली. दापोली विधानसभा मतदारसंघातून रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यात मुंबईतील एकूण 36 विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघांवर शिंदे गटाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

अमित ठाकरे यांच्याविरोधात सदा सरवणकर :यातील महत्त्वाची बाब म्हणजे एका बाजुला अमित ठाकरे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीनं उमेदवार देऊ नये, अशी मागणी केल्याच्या चर्चा होत्या. मात्र एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या यादीत माहीम विधानसभा मतदारसंघात आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता जरी महाविकास आघाडीनं अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही, तरी, अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्यातील लढत पक्की झाली आहे.

हेही वाचा :

  1. लाडकी बहीण योजनेला ब्रेक? मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं
  2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा थांबवत महिलांनी केलं औक्षण
  3. विधानसभा निवडणूक 2024 : हरियाणाची पुनरावृती महाराष्ट्रात होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
Last Updated : Oct 23, 2024, 6:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details