मुंबईEknath Shinde notice to Sanjay Raut :लोकसभा निवडणुकीचं पाचव्या टप्प्यातील आणि राज्यातलं शेवटचं मतदान 20 मे रोजी पार पडलं. तरी देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबताना दिसत नाहीत. दररोज नेत्यांकडून परस्परांवर वेगवेगळे आरोप होतायत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर, नाशिक दौऱ्यात पैसा वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या आरोपानंतर पुढील दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व बॅगा तपास यंत्रणांकडून तपासून घेतल्या होत्या. या बॅगांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कपड्या व्यतिरिक्त काहीही नसल्याचं त्यांनी दाखवलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी बिनबुडाचे आरोप थांबवावे, असं त्यांनी म्हटलं होतं.
संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस : या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर फर्ममार्फत खासदार संजय राऊत यांना बिन बुडाचे आरोप केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत बिनबुडाचे होते. आपण कधीही कुठंही पैशाचा वापर केला नाही. आपल्या सोबत असलेल्या बॅगात साहित्य होतं. मात्र, तरीही संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. याप्रकरणी संजय राऊत यांनी तीन दिवसात बिनशर्त माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसंच संजय राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.