मुंबई-महाविकास आघाडीच्या आज होणाऱ्या बैठकीत विरोधी पक्षनेता निवड आणि विधिमंडळाच्या विविध समित्यांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिलीय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल अद्याप अनिश्चितता असल्याने काँग्रेसकडून याबाबत चर्चा करण्यात येणार नसल्याचे ते म्हणालेत. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाची 22 जानेवारीला असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील की नाहीत, याची शंका आहे, असंही त्यांनी सांगितलंय. महापालिका निवडणूक कधी होणार याची अनिश्चितता आहे. त्यामुळे काँग्रेसला आताच याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
भाजपाचा खरा चेहरा आता कळेल : भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आता कळेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावलाय. सरकारला त्यांचेच आमदार सांभाळता येत नसल्याने विरोधी पक्षाच्या आमदारांबद्दल संभ्रम पसरवला जात असल्याचं पटोले म्हणालेत. काँग्रेसतर्फे 25 जानेवारीला मतदार दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. निवडणूक आयोगाने आणि भाजपाने मिळून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केलंय, असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे निवडणूक आयोगाला शुभेच्छा देणार असल्याचे उपरोधिकपणे नाना पटोले म्हणालेत. मतदार दिनानिमित्त तालुका आणि जिल्हा स्तरावर याबाबत निवेदन सादर करण्यात येईल, अशी माहितीही नाना पटोलेंनी दिलीय.
राज्य सरकार चमत्कारी सरकार :महाराष्ट्रातील राज्य सरकार चमत्कारी सरकार आहे. सहपालकमंत्री नेमणे हा चमत्कार त्यांनी करून दाखवलाय. केवळ पालकमंत्री नेमण्याऐवजी त्याच्यासोबत सहपालकमंत्री नेमून एकटे खाऊ नका, मिळून खा असा संदेश त्यांनी दिला असावा, अशी खिल्लीही पटोलेंनी उडवलीय. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांवर नामुष्की आलीय. राज्य सरकार तिजोरीला लुटायचे काम करीत आहे, असा आरोप त्यांनी केलाय. मलईदार विभागासाठी, जिल्ह्यासाठी मंत्र्यांमध्ये भांडणं चालली आहेत, त्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही, असंही नाना पटोलेंनी अधोरेखित केलंय.