महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकनाथ खडसे यांची लवकरच 'घरवापसी', भाजपात परतण्याचे दिले संकेत - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : एके काळी महाराष्ट्राचे 'फायरब्रॅंड' नेता म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीसाठी नाही, तर भारतीय जनता पार्टीसाठी! एकनाथ खडसे लवकरच स्वगृही म्हणजेच भाजपात दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

Eknath Khadse may rejoin the BJP
File photo Eknath Khadse (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 5:24 PM IST

मुंबईःLok Sabha Election 2024 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेता एकनाथ खडसे स्वगृही म्हणजे भारतीय जनता पार्टीत जाण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. 'योग्य वेळ' साधून एकनाथ खडसे भाजपाशी असलेला दुरावा संपवणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच एकनाथ खडसे महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांवर हल्लाबोल करताना आणि भाजपावर स्तुतिसुमनं उधळताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काहीही घडू शकतं.

राजकीय समीकरणं बदललीःलोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा शुक्रवार 16 मार्च रोजी झाली. आदर्श आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच अनेक राजकीय पक्षांच्या बडे नेतामंडळींमध्ये पक्षांतराची सुरु झालेली स्पर्धा थेट निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत सुरुच राहणार आहे. अनेक राजकारण्यांचा स्वाभाविक कल सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये सामील होण्याकडेच आहे. पक्षांतर करणाऱ्यांच्या यादीत सर्वात वरचं नाव एकनाथ खडसे यांचं आहे. ही माहिती अनेक राजकीय विश्लेषक तसंच अगदी राजकारण्यांच्या भुवया उंचावणारी असू शकते. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश घडवून आणण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका भाजपाच्या राज्यातल्या दोन मोठ्या नेत्यांनी बजावली आहे. विशेष म्हणजे याबाबतीत एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना 'तळ्यात- मळ्यात' भूमिका न ठेवता भाजपात पुन्हा दाखल होण्याचं सूतोवाच केलं. अर्थात, आपली भूमिका कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच जाहीर करु, अशी 'अधिकची माहिती' द्यायलाही ते विसरले नाहीत.

झालं गेलं गंगेला मिळालंः एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस तसंच गिरीश महाजन यांच्यातून विस्तव जात नाही, हे सर्वश्रुत आहे. कधीकाळी भाजपातल्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संसदीय आयुधांच्या प्रभावी वापर करायला मुळातच हुशार असलेले देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन शिकले. मात्र खडसे भाजपात असतानाच त्यांचे फडणवीस आणि महाजन यांच्या बरोबरचे संबंध तुटण्याइतके ताणले गेले. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरच्या आरोपांनी एकनाथ खडसे यांनी विधानसभा सभागृह दणाणून सोडलं, त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचं 'घड्याळ' मनगटावर बांधण्याची वेळ एकनाथ खडसे यांच्यावर आली. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं अगदी 'तुतारी' फुंकत स्पष्ट केलं. पण अख्खी हयात भाजपात घालवलेले एकनाथ खडसे भाजपा सोडल्यानंतर अस्वस्थच होते. आपण भाजपा सोडली त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचं खडसे यांनी वेळोवेळी बोलून दाखवलं. गिरीश महाजन यांनी खडसे यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडली नाही. तर देवेंद्र फडणवीस त्यांना अनुल्लेखाने मारत राहिले. पण काही दिवसांपूर्वी चक्रं फिरली. एकनाथ खडसे यांच्या खासदार स्नुषा रक्षा खडसे यांनी आपल्या पितृतुल्य सासऱ्यांच्या भाजपा प्रवेशाचं आधी संकेत दिले आणि नंतर घूमजाव केलं. तेव्हाच पडद्याआड काहीतरी शिजत असल्याचा अंदाज यायला लागला.

खेळाचा दुसरा अंकःभाजपाच्या लोकसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातल्या रावेर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची सून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचं नाव जाहीर झालं आणि खेळाचा दुसरा अंकही सुरु झाला. आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत, असं म्हणणाऱ्या खडसे यांनी वेळ येताच प्रकृतीचं कारण देत लोकसभा निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली. रक्षा खडसे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास काय तर प्रचार करायलाही खडसे तयार नाहीत, हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अर्थातच ठाऊक आहे. खडसे त्यांचा निर्णय अंमलात आणण्यापूर्वी आपल्याला सांगतीलच, याची पवार यांना खात्री आहे.

चौकशी यंत्रणांचा ससेमिरा संपणार ?: राज्य सरकारमध्ये महसूल मंत्री असताना पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील कोट्यवधी रुपये किमतीचा सरकारी जमिनीचा तुकडा जावई गिरीश चौधरी यांना दिल्याच्या आरोपावरुन खडसे यांची चौकशी सुरु आहे. चौकशी यंत्रणा त्यांच्या मागे अक्षरशः हात धुवून मागे लागल्या होत्या. मात्र आता खडसे आणि कुटुंबीयांच्या चौकशीचं हे मळभ लवकरच हटणार असल्याचे संकेतही मिळाले आहेत. लवकरच एकनाथ खडसे यांना कथित भ्रष्टाचाराच्या आरोपातून 'क्लीन चीट' मिळाली तरी आश्चर्य वाटायला नको. त्यामुळेच भाजपा विरोधाची तलवार खडसे म्यान करणार आहेत आणि लवकरच नव्याने भाजपामध्ये राजकीय प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details