महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेमा कायद्याचं कथित उल्लंघन प्रकरण : निरंजन हिरानंदानी यांची ईडीकडून 11 तास कसून चौकशी - निरंजन हिरानंदानी

ED questions Niranjan Hiranandani : प्रसिद्ध उद्योजक निरंजन हिरानंदानी यांनी फेमा ( FEMA ) कायद्याचं कथित उल्लंघन केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयानं (ED ) केला होता. या प्रकरणीईडीनं निरंजन हिरानंदानी यांनी तब्बल 11 तास चौकशी केली.

ED questions Niranjan Hiranandani
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 10:30 AM IST

मुंबई ED questions Niranjan Hiranandani : अंमलबजावणी संचालनालयानं (ED) उद्योजक निरंजन हिरानंदानी यांनी परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचं (फेमा) उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं ( ED ) निरंजन हिरानंदानी आणि त्यांचा मुलगा दर्शन हिरानंदानी यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं होतं. सोमवारी निरंजन हिरानंदानी सकाळी साडेअकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी निरंजन हिरानंदानी यांची रात्री सव्वा दहा वाजेपर्यंत ईडी चौकशी करण्यात आली.

प्रसिद्ध उद्योजक निरंजन हिरानंदानी

तब्बल 11 तास करण्यात आली चौकशी :हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी यांना FEMA कायद्याच्या कथित उल्लंघनाचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी तब्बल 11 तासांच्या चौकशीनंतर रात्री सव्वा दहा वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, "हे 16 वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे. कदाचित चौकशी 42 वेळा झाली आहे आणि ही 43 वी वेळ आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या प्राधिकरणाकडून मुद्दा उपस्थित केला जातो, तेव्हा मला खूप आनंद होतो. आम्ही या प्रकरणी सहकार्य करत आहोत, पुढंही सहकार्य करणार आहे. समस्या काय आहेत हे शोधणं तपास यंत्रणांचं कर्तव्य आहे."

ईडी चौकशीला मारली होती दांडी :हिरानंदानी पिता-पुत्रांनी 26 फेब्रुवारीला देखील ईडीच्या चौकशीला दांडी मारली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा ईडीनं त्यांना समन्स बजावलं होतं. मात्र, हिरानंदानी पिता पुत्र त्यावेळी चौकशीला हजर राहू शकले नव्हते. तब्येतीचं कारण देत ईडीच्या चौकशीला निरंजन हिरानंदानी आणि त्यांचा मुलगा दर्शन हिरानंदानी यांनी दांडी मारली होती.

'पँडोरा पेपर्स'मध्ये आलं होतं नाव :इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट (आयसीआयजे) जाहीर केलेल्या 'पँडोरा पेपर्स'मध्ये नाव समोर आलं होतं. हिरानंदानी ग्रूप आणि निरंजन हिरानंदानी यांच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य 60 दशलक्ष डॉलर्सच्या मालमत्तेसह ट्रस्टचे लाभार्थी होते, असा दावा करण्यात आला होता. ट्रस्टच्या लाभार्थ्यांची चौकशी करत ईडीच्या पथकानं हिरानंदानी समूहाच्या मुंबई आणि आसपासच्या परिसरातील मालमत्तांवर गुरुवारी छापेमारी केली होती. ईडीनं या कारवाईमध्ये महत्वपूर्ण कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज जप्त केले आहेत. त्याआधारे पुढील तपास करण्यासाठी हिरानंदानी पिता-पुत्राला समन्स बजावण्यात आलं.

हिरानंदानी समूहाची ब्रिटिश वर्जिन आयलंडमध्ये मालमत्ता :हिरानंदानी समूहानं 2006 ते 2008 दरम्यान ब्रिटिश वर्जिन आयलंडमध्ये सुमारे 25 कंपन्या आणि एक ट्रस्ट स्थापन केली. त्या माध्यमातून 60 दशलक्ष युएस डॉलर्सची मालमत्ता गोळा केल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये बांधकाम प्रकल्प असलेल्या समूह कंपन्यांना सुमारे 400 कोटी रुपये थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) स्वरूपात मिळाले. ही गुंतवणूक सरकारी नियमानुसार नव्हती. तसेच एफडीआय मिळालेल्या समूह घटकांपैकी एकानं बँकांच्या संघाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही आणि ते कर्ज बुडीत घोषित करण्यात आलं. हे अपूर्ण प्रकल्प नंतर कर्ज वसुली लवादाच्या (डीआरटी) कार्यवाही अंतर्गत हिरानंदानी समूहाच्या दुसऱ्या संस्थेनं ताब्यात घेतल्याबाबत ईडी तपास करत आहे.

हेही वाचा :

  1. हिरानंदानी ग्रूपच्या मुख्यालयासह अनेक कार्यालयांवर ईडीची छापेमारी, कारण काय?
  2. Cash For Query Case : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार?
  3. Mahua on Hiranandanis affidavit : 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात पश्चिम बंगालच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या...

ABOUT THE AUTHOR

...view details