मुंबई Economy Survey Report : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून आज पहिल्या दिवशी सन 2023-24 चा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत यंदा 7.6 टक्क्यांनी वाढ अपेक्षित असल्याचं या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलय. त्यासोबत देशाच्या अर्थव्यवस्थेतही 7.6 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राज्याच्या कृषीपूरक क्षेत्रातही 1.9 टक्क्यांची वाढ : महाराष्ट्र राज्याचा विस्तारित अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी विधिमंडळात सादर करणार आहेत. राज्याची अर्थव्यवस्था वाढणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा 7.6 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या कृषी व संलग्न क्षेत्राचा एकंदरीत विचार केला तर पिकांच्या विभागात 1.5 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासोबत राज्याच्या कृषी पुरक क्षेत्रातही 1.9 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सेवा क्षेत्रांचा सर्वात मोठा 63.8 टक्के वाटा : आर्थिक पाहणीच्या अहवालानुसार वन संवर्धन क्षेत्रात 2.9 टक्के वाढ अपेक्षित असून उद्योग क्षेत्रात 7.6 टक्के वाढ अपेक्षित आहे. बांधकाम क्षेत्रात 6.2 टक्के वाढ, वस्तू निर्मिती क्षेत्रात 7.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यासोबत राज्यातील व्यापार हॉटेल्स उपहारगृहं, वाहतूक, साठवण, दळणवळण या सर्व क्षेत्रांमध्ये 6.6 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे स्थावर मालमत्ता, वित्तीय, व्यवसायिक सेवांमध्ये सुद्धा 10.1 टक्के वाढ अपेक्षित आहे. सुरक्षा तसंच इतर सेवा यामध्ये 7.6 टक्के तर थेट सेवा क्षेत्रात 8.8 टक्के वाढ अपेक्षित आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात राज्याच्या आर्थिक विकासामध्ये सेवा क्षेत्रांचा सर्वात मोठा 63.8 टक्के वाटा असून त्या मागोमाग उद्योग क्षेत्राचा 25 टक्के वाटा आहे.
महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर : सन 2023-24 चं राज्याचं उत्पन्न 40.44 लाख कोटी रुपये इतकं असून त्यामध्ये आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत 10.9 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. तर देशांतर्गत उत्पन्न हे 293.90 लाख कोटी रुपये इतके असून त्यात 2022-23 च्या तुलनेत 9.1 टक्के वाढ अपेक्षित आहे. सन 2023-24 मध्येच राज्याचं दरडोई उत्पन्न 2,77,603 रुपये इतकं अपेक्षित असून सन 2022-23 मध्ये ते 2,52,389 रुपये इतकं होते. त्याचप्रमाणे सन 2023-24 मध्ये देशाचं दरडोई उत्पन्न 1,83,236 रुपये इतकं होते. तर गेल्यावर्षी ते 1,69,496 रुपये इतके होते. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सन 2022-23 मध्ये तेलंगणा राज्य देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू, गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो तर महाराष्ट्र हा सहाव्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा :
- महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा... - Maharashtra Politics
- पावसाळी अधिवेशन 2024 : देवेंद्र फडणवीसांसोबत लिफ्टमधून एकत्र प्रवास; उद्धव ठाकरेंनी विधानभवनात दाखवला 'ठाकरी बाणा' - Assembly Monsoon Session 2024
- अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानं महायुतीत मिठाचा खडा; अमोल मिटकरी यांचा बोलविता धनी कोण? - Dispute in Mahayuti