नवी दिल्ली :निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला झटका दिला आहे. आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) मधील वादावर पडदा टाकला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या पारड्यात टाकलं.
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन सत्तेत स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट निर्माण झाली. त्यानंतर राष्ट्रवादी खरी कुणाची हा वाद निर्माण झाला? याबाबत दोन्ही गटाकडून राष्ट्रवादीचे नाव, चिन्हावर दावा करण्यात आला होता. त्यावर अखेर आज निकाल आला आहे. या निकालानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तर अजित पवार गटाला आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं हा निकाल फायदेशीर असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
नव्या उमेदीनं पक्ष उभा करणार-निवडणूक आयोगाच्या निकालानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. खासदार सुळे म्हणाल्या, " ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. जे शिवसेनेसोबत झाले, तेच राष्ट्रवादी सोबत झाले. निवडणूक आयोगाच्या निकालाचं आश्चर्य वाटत नाही. फक्त आमदार संख्येवरून पक्ष अजित पवारांना दिला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. या निर्णयामागे अदृष्य शक्तीचा हात आहे. या अदृश्य शक्तीचा आज विजय झाला. निवडणूक आयोगाचा निर्णय हा महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे. आम्ही पुन्हा उभे राहू, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. नव्या उमेदीनं पक्ष उभा करणार आहोत.
- निवडणूक आयोगानं 141 पानांचा निकाल दिला आहे. 81 पैकी 28 लोकप्रतिनिधी अजित पवार गटाकडं आहेत. शरद पवार यांनी नव्या पक्षासाठी अर्ज करावा, अन्यथा त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्षाचा दर्जा असणार आहे. अजित पवार गटाकडं लोकप्रतिनिधींचे बहुमत आहे.
कशामुळे अजित पवारांना मिळाला पक्ष-राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या तीन वाजेपर्यंत नाव सूचवा, अशी निवडणूक आयोगानं शरद पवार यांनी खास सवलत दिली आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगात १० हून अधिक सुनावणी घेतल्यानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडंच राष्ट्रवादीची मालकी राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेची उद्दिष्टे तपासून पाहिली. संघटनात्मक बहुमत असल्याच्या शरद पवार गटाच्या दाव्याच्या वेळेच्या बाबतीत गंभीर विसंगती आढळल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
आमचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध-राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आम्ही लोकशाहीत असल्यानं कोणत्याही निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकते. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून योग्य असल्याचे" सिद्ध झालं.
शरद पवार काय निर्णय जाहीर करणार?आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना त्यांच्या नव्या राजकीय स्थापनेसाठी निवडणूक आयोगाने विशेष सवलत दिली आहे. वादग्रस्त अंतर्गत संघटनात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीमुळे 'अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे चिन्ह मिळण्यास मदत झाली. अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष गमाविला असल्यानं ते भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानं धक्का बसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसचं निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा-
- राष्ट्रवादी खरी कोणाची? निवडणूक आयोगात आजपासून तीन दिवस होणार सुनावणी, शरद पवार राहणार हजर
- राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सोमवारी पुन्हा सुनावणी