महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची शिवतीर्थावर, तर मुख्यमंत्री शिंदेंची आझाद मैदानात तोफ धडाडणार - DUSSEHRA MELA

शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेनेचे दसऱ्याला दोन मेळावे होत आले असून, यंदा शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा तर आझाद मैदानात एकनाथ शिंदेंच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा होतोय.

uddhav thackeray and eknath shinde
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2024, 3:15 PM IST

मुंबई -शनिवारी १२ ऑक्टोबरला साजरी होणारी विजयादशमी अर्थात दसऱ्यानंतर कधीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव दसऱ्याच्या दिवशी राज्यात होणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेनेचे दसऱ्याला दोन मेळावे होत आले असून, यंदा शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा तर आझाद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा होतोय. अशात या मेळाव्यात दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या कशा पद्धतीच्या तोफा धडाडत आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. विशेष म्हणजे शिवाजी पार्क, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी यंदा शिंदे गटाकडून कुठल्याही पद्धतीचा अट्टहास करण्यात आलेला नाही हे विशेष आहे.



शिवाजी पार्क व शिवसेना अतूट नातं :शिवाजी पार्क (अर्थात आताचं शिवतीर्थ) आणि शिवसेनेचा दसरा मेळावा यांचं मागील ५८ वर्षांपासूनच अतूट नातं आहे. १९६६ साली शिवसेनेच्या जन्मापासून आतापर्यंत एखाद पावसाचा अपवाद वगळता शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होत आलाय. हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच दसरा मेळाव्यातून २०१२ पर्यंत विचारांचं सोनं जनतेला दिलं होतं. नंतर २०१३ पासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्याचं नेतृत्व करीत आहेत. परंतु २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडली आणि राज्यात झालेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना विभागली गेली. शिवसेनेचे दोन दसरे मेळावे होऊ लागलेत. यंदा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा हा तिसरा दसरा मेळावा असून, पहिला मेळावा मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात, दुसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात आणि आता तिसरा मेळावासुद्धा आझाद मैदानात संपन्न होतोय.



मुख्यमंत्रिपदाबाबत भूमिका स्पष्ट करा?: शनिवारी १२ ऑक्टोबरला शिवतीर्थावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा ५८ वा दसरा मेळावा होत असून, येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. याप्रसंगी उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणात महायुतीचा आणि त्यांच्या नेत्यांचा समाचार घेतीलच. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाषणात टार्गेटवर असणार आहेत. तर दुसरीकडे आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला विशेष करून भाजपाला चारीमुंड्या चित केल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावलाय. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्या कारणाने त्याचा फायदा काँग्रेसला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला झाला हे लपून राहिलेलं नाही. अशा परिस्थितीत "निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, शरद पवार तसेच काँग्रेस जो चेहरा ठरवतील, त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल", अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी एकदा नाही, तर दोनदा केलीय. परंतु त्यावर अद्यापही काँग्रेस किंवा शरद पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याकारणाने दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे पुन्हा या विषयावर शरद पवार तसेच काँग्रेसचा कडक शब्दांत समाचार घेण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा झालेला पराभव यावरही उद्धव ठाकरे टीकास्त्र सोडू शकतात.



महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे निशाण्यावर : विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रह धरला नाही. एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा हा आझाद मैदानात होणार आहे. मागच्या वर्षीही शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावरच झाला होता. परंतु त्यापूर्वी त्यांनी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी अट्टहास धरला होता. अखेर कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांना तो अट्टहास सोडावा लागला होता. यंदाच्या दसरा मेळाव्याची शिंदे गटाकडूनही जोरदार तयारी करण्यात आलीय. ५० हजार खुर्च्या या ठिकाणी बसवण्यात आल्यात. जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांना आझाद मैदानात पोहोचण्याचे निर्देश देण्यासोबत तशा पद्धतीची तयारी करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात महाविकास आघाडी त्यासोबत उद्धव ठाकरेंचा कडक शब्दात समाचार घेतील, यात शंका नाही. शिवसेनेत फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सतत सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणल्याने त्याचा फायदा या निवडणुकीत महायुतीला होण्याचा अंदाज जास्त असल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अनेक सरकारी योजनांचा पाढा मुख्यमंत्री आपल्या भाषणात वाचतील. यासोबत केंद्रातील मोदी सरकारच्या कामाची प्रशंसा करण्याचं कामसुद्धा मुख्यमंत्री करतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी सतत मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कामाची प्रशंसा केलीय. परंतु मागच्या वर्षी याच आझाद मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला स्मरून मराठ्यांना आरक्षण देण्याची शपथ घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठ्यांना आरक्षण देण्यात अद्यापही पूर्णपणे यशस्वी ठरले नसल्याने मराठ्यांच्या आरक्षणाबाबत ते काय बोलतात, हे बघंणही गरजेचे असणार आहे.

हेही वाचा

  1. विदर्भासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 'मिशन 51'; भाजपाला तारणार का?
  2. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; 'हे' घेतले महत्त्वाचे ३८ निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details