पुणे Pune Drug Smuggling Case : ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी पुणे तसेच दिल्ली इथं कारवाई करत तब्बल 1700 किलो एमडी ड्रग्ज पकडलं आहे. या पकडण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत जवळपास तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची आहे. ड्रग्ज प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे. दिल्लीत करण्यात आलेल्या कारवाईत कुरिअर कंपनीच्याद्वारे काही ड्रग्जसाठा लंडन इथं पाठवण्यात येणार असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आतापर्यंत पुणे पोलिसांनी 8 तस्करांना अटक केली आहे. हे सर्व तस्कर कोडींगद्वारे संभाषण करत असल्याचं समोर आलं आहे. यात लंबा बाल, मुंबई का बंदर अन् नमक पार्सल असं कोडींग केल्याचं पोलीस तपासात पुढं आलं आहे.
लंबा बाल, मुंबई का बंदर अन् नमक पार्सल :लंबा बाल, मुंबई का बंदर, नमक पार्सल अशा स्वरूपाच्या कोडींगद्वारे हे सर्व आरोपी एकमेकांशी संपर्कात होते. मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी या टोळीकडून प्रत्येकाला टोपण नाव देण्यात आलं होतं. सराईत गुन्हेगार वैभव माने याला केसांची शेंडी असून त्याला 'लंबा बाल' म्हणून ओळखलं जात होतं. तसेच मुंबईत राहणारा आरोपी युवराज भुजबळ याला 'मुंबई का बंदर' म्हणून ओळखलं जात होतं. मेफेड्रॉनची तस्करी ही मिठाच्या गोण्यांमधून केली जात होती. 30 ते 40 किलो मिठाच्या गोणीत एक किलो मेफेड्रॉनचा बॉक्स ठेवून 'नमक पार्सल' असं कोडिंग वापरलं जात होतं. आरोपींचा मोबाइल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला कोडिंगची उकल करण्यात यश आलं आहे.