मुंबई Dr Pinto : डॉक्टर अनिल पिंटो यांच्याकडून फेब्रुवारी 1984 मध्ये रुग्णाच्या हाताची एक नस कापली गेली होती. यामुळे रुग्णाचा तीन दिवसांनी मृत्यू झाला. त्याबाबत पाच हजार रुपये दंड आणि शिक्षा सत्र न्यायालयानं ठोठावली होती. परंतु डॉक्टरांनी हायकोर्टात अपील केलं. आता मुंबई उच्च न्यायालयानं पाच लाख रुपये दंड आणि दहा दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हा आदेश ९ फेब्रुवारीला दिला.
शस्त्रक्रिया करताना कापली नस :फेब्रुवारी 1984 मध्ये रुग्ण प्रकाश यांना डॉक्टर अनिल पिंटो यांच्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली. परंतु उपचार करताना डॉक्टरकडून शस्त्रक्रिया करताना काही चूक झाली. डॉक्टरांनी ऑपरेशन करत असताना प्रकाश यांच्या एका हाताची नसच कापली. त्यानंतर तीन दिवसांनी रुग्णाचा मृत्यू झाला. परिणामी त्यांच्या वारसांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
शस्त्रक्रिया करताना केला निष्काळजीपणा :सत्र न्यायालयाच्या निर्णयाचं पालन डॉक्टरनं केलंच नाही. मुंबई सत्र न्यायालयानं घटनेच्या दहा वर्षानंतर डॉक्टर अनिल पिंटो यानं रुग्णाच्या संदर्भात शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा केला, या तथ्यांच्या आधारे दोषी ठरवलं. त्याला दहा दिवसाचा कारावास तसंच पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्याचा निर्णय दिला होता.