ठाणे ThaneDogs Story : आपण जर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर जात असाल किंवा रात्र पाळी करत असाल तर सावधान. (Thane Dog News) कारण ठाण्यात दर दिवसाला शंभर कुत्र्यांच्या चावा घेतल्याची आकडेवारी समोर आलीय. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तीन वर्षापासून बंद असलेली भटक्या कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया पुन्हा हाती घेण्यात आलीय. नसबंदी शस्त्रक्रिया बंद असल्यानं ठाण्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. वर्षभरात तब्बल आठ हजार 781 ठाणेकरांचां चावा भटक्या कुत्र्यांकडून घेण्यात आला आहे. वर्षभरात 36 हजार लोकांना श्वानदंशावरील इंजेक्शन टोचून घ्यावी लागली आहेत.
3983 ठाणेकरांना कुत्र्यांनी चावा : दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला निघणारे नागरिक आणि रात्रपाळी वरून घरी येणारे कर्मचारी यांच्यात या भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात दहशत आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना आणि रात्रपाळी वरून घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच जास्त श्वान दंश झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळं मॉर्निंग वॉक करणारे आणि रात्रपाळीवरून घरी येणाऱ्यांना श्वानांची चांगलीच दहशत बसली आहे. मागील तीन महिन्यात 3983 ठाणेकरांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं ठाणेकरांच्या चिंतेत वाढ झालीय. ठाण्यातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत असून तेथील नागरिक देखील हैराण झाले आहेत.
उपाययोजना पालिकेच्या कागदावरच: भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं विविध उपाय योजना करण्यात आल्या होत्या. भटक्या कुत्र्यांना एकत्र दुसऱ्या ठिकाणी घेण्याचा विचार झाला होता. परंतु ही योजना कागदावरच राहिल्यानं भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेकडं अपुरे कर्मचारी, अपुरे वाहन संख्या यामुळं भटक्या कुत्रांना पकडणं कठीण असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे.
महापालिका हद्दीत श्वानांची संख्या ६०००० : 2019 मध्ये ठाणे महापालिका हद्दीतील श्वानांची गणना केली असता, त्यावेळी श्वानांची संख्या ही 46000 च्या आसपास होती. तर आता ती संख्या 60000 हून अधिक झाल्याचा अंदाज महानगरपालिकेनं वर्तवलेला आहे. त्यामुळं महापालिका या कागदावरच्या योजना सत्यात उतरवत आहेत का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भात पालिकेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांना विचारणा केली असता त्यांनी क्षमा शिरोडकर या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घ्या असं सांगितलं. मात्र क्षमा शिरोडकर यांनी फोन घेतला नाही. तर या सर्व बाबी टाळण्यासाठी कशा प्रकारे काळजी घ्यावी हे प्राणी मित्रांनी सांगितलं आहे.
तुम्ही भटक्या कुत्र्याला कशी मदत करू शकता -
• तुमच्या परिसरातील भटक्यांसाठी अन्न आणि पाणी द्या.
• तुमच्याकडं येणाऱ्या भटक्यांना आश्रय द्या.
• जखमी झालेल्या भटक्यांना जोपर्यंत ते बरे होत नाही तोपर्यंत पालनपोषण करा.
• भटका कुत्रा किंवा मांजर दत्तक घ्या.
• महानगरपालिकेच्या मदतीनं तुमच्या परिसरातील भटक्यांचे निर्जंतुकीकरण करा, ही भटक्या कुत्र्यांची आणि मांजरींची संख्या कमी करण्यासाठी केवळ वैज्ञानिक पद्धत आहे.
• कुत्रे आणि मांजर प्रादेशिक प्राणी असल्यानं कोणत्याही भटक्याला त्याच्या मूळ जागेवरून कधीही हलवू नका.