बुलढाणा : एकीकडं राज्य सरकार 'लाडकी बहीण योजना' राबवून महिलांच्या बाबतीत कल्याणकारी भूमिका घेताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडं सुरू असलेल्या गर्भपातामुळं मुलींच्या जन्मात घट होत आहे. बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक भागवत भुसारी यांच्या आदेशान्वये एका पथकानं जिल्ह्यात तीन ठिकाणी पीसीपीएनडीटी च्या कायद्यन्वये कारवाई केली. त्यात नांदुरा, मेहेकर आणि रिसोड या ठिकाणी धाड टाकली असता दोषी आढळल्यानं सोनोग्राफी मशीन सील केल्या आहेत.
काय आहे घटना? :शुक्रवारी एका महिलेचा पाठलाग करत वाशिमच्या रिसोड येथील शिव मूळव्याध हॉस्पिटल आणि प्रसूती गृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गर्भलिंग चाचणी केल्यानंतर रिसोड येथे गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्य पथकांना मिळाली होती.
औषध आणि साहित्य जप्त : बुलढाणा, वाशिम आणि रिसोड येथील संयुक्त कारवाई दरम्यान गर्भपातासाठी वापरण्यात आलेली औषधं आणि साहित्य जप्त करण्यात आलं आहे. घटनास्थळी डॉ. अमोल भोपाळे उपस्थित असल्यानं त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अधिक आरोपी असण्याची शक्यता आहे.