रामटेक :Modi Sabha In Ramtek : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशभरात जाहीर सभा आणि रोड शो करत आहेत. आज बुधवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेक येथे प्रचार सभा झाली. त्यामध्ये बोलताना काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कारापासून दूर ठेवलं असा जोरदार हल्ला मोदींनी इंडिया आघाडीवर केला. तसंच, यावेळी महाराष्ट्रात इंडिया आघाडीला एकही जागा निवडून देऊ नका असं आवाहनही मोदींनी यावेळी उपस्थितांना केलं आहे. व्यासपीठावर नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी, रामटेक मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
'शिव्या वाढल्या की विजय निश्चित' : येत्या 19 एप्रिलला तुम्हाला फक्त एक खासदार निवडायचा नाही, तर पुढच्या एक हजार वर्षाचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करायचं आहे. आपल्याला विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करायचं आहे. निवडणुकीबाबत मीडियाकडून सर्व्हे दाखवला जातोय. त्यात एनडीएचा बंपर विजय दाखवला जातोय. या सर्व्हेच्या मागे मीडियावाले इतका खर्च का करता? त्यांना पैसे वाचवण्याचा एक फॉर्म्युला देतो. मोदीला जेव्हा शिव्या वाढायला लागल्या तर समजा पुन्हा मोदी जिंकून येणार. जेव्हा विरोधक माझ्या आई-वडिलांबद्दल मला अपशब्द बोलतात तेव्हा समजून जायचं पुन्हा एकदा मोदी सरकार. ईव्हीएम प्रश्न उपस्थित झाले तेव्हा समजून जा पुन्हा एकदा मोदी सरकार”, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
'कितीही हल्ला केला तरी हटणार नाही' : इंडिया आघाडीवाले एक खोटं पसरवत आहेत की, मोदी पुन्हा सरकारमध्ये आले तर लोकशाही आणि संविधान संकटात येईल. मी जेव्हा राजकारणात आलो आहे तेव्हापासून अशी कोणतीही निवडणूक राहिलेली नाही ज्यामध्ये विरोधकांनी अशी भाकडकथा ऐकवलेली नाही. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार बनलं तेव्हाही ते असेच गीत गात होते. याचा अर्थ यांच्याकडे नवी कल्पनाही नाही असं म्हणत मोदींनी आणीबाणीच्या वेळी लोकशाही धोक्यात आली नव्हती का असा प्रश्न उपस्थित केला. तसंच, एका गरिबाचा मुलगा पंतप्रधान बनताच विरोधकांना लोकशाही आणि संविधान धोक्यात दिसतं. इंडिया आघाडीवाले कधीही गरिबांना पुढे जाताना बघू शकत नाहीत. मराठीत एक म्हण आहे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. पाण्यात कितीही लाठी मारा. पाणीत भेदत नाही. गरिबाच्या मुलावर या लोकांनी कितीही हल्ला केला तरी मोदी देशाच्या संकल्पनांसाठी मागे हटणार नाही असंही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत.
'हिंदू धर्माच्या शक्तीला समाप्त करु इच्छित आहेत' : इंडिया आघाडी ताकदवान झाली तर देशाचे तुकडे-तुकडे करतील. ते आजही एका समाजाला दुसऱ्या समाजात लढवण्यासाठी कोणतीही कसर मागे सोडत नाहीत. आमचं रामटेक हे ते स्थान आहे जिथं स्वत: प्रभू श्रीरामांचे पाय लागले आहेत. यावेळी अयोध्येत आमचे रामलल्ला टेंटमध्ये नाही तर भव्य मंदिरात दर्शन देतील. 500 वर्षांनी हा क्षण येत आहे. रामटेकला, महाराष्ट्रला आणि देशाला अद्भूत आनंद होत आहे. पण प्राणप्रतिष्ठानच्या वेळी या लोकांनी निमंत्रण स्वीकारलं नाही. हे लोक हिंदू धर्माच्या शक्तीला समाप्त करु इच्छित आहेत. अशा इंडिया आघाडीला महाराष्ट्रात एक तरी जिंकू द्याल? त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली पाहिजे की नाही? त्यांना मतदानातून शिक्षा देणार की नाही?, असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला आहे.
रामदार आठवले काय म्हणाले :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आम्ही सर्वोच्च स्थानी मानतो. त्यामुळे आम्ही या देशाच्या राज्यघटनेला कुणालाही हात लावू देणार नाही. असा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय. ते, रामटेकमध्ये आयोजीत महायुतीच्या सभेत बोलत होते. तसंच, काँग्रेस पक्ष आज धोक्यात आला असताना ते लोकशाही धोक्यात असल्याचा बनाव रचत आहेत. मात्र, लोकशाही कधीही धोक्यात येऊ शकत नाही. या लोकशाहीच्याच जोरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदा देशाचे पंतप्रधान झाले. आम्ही लोकशाही मानणारे लोक असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आम्ही सर्वोच्च स्थानी मानतो. त्यामुळे आम्ही या देशाच्या राज्यघटनेला कुणालाही हात लावू देणार नाही. कोण म्हणतं या देशाची घटना बदलली जाणार आहे. त्यात अजिबात तथ्य नसून अतिशय चुकीचा प्रचार करून समाजामध्ये फूट पाडण्याचं काम सध्या विरोधकांकडून करण्यात येत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर केला.
नितीन गडकरी काय म्हणाले : भाजप संविधान बदलणार असा खोटा प्रचार काँग्रेस करत आहे. पण मोदींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, संविधान बदलणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेही तसे आदेश दिले आहेत. खरेतर आजवर संविधान 80 वेळा काँग्रेसने तोडलं आहे. आणीबाणीच्यावेळी इंदिराजींनी संविधान असं तोडलं की लोकशाही संपण्याच्या मार्गावर आली होती, असा घणाघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. ते रामटेकमधील सभेत बोलत होते. तसंच, काँग्रेसवाले अल्पसंख्यांकांना घाबरवत आहेत, सुरक्षित राहायचे असेल तर पंजावर बटण दाबा असे म्हणत आहेत. दलितांना म्हणतात संविधान बदलले जाणार, मतदारांनो हा खोटा प्रचार ओळखा, असंही गडकरी यावेळी म्हणाले. दरम्यान, विदर्भातील सर्व 10 जागा आम्ही जिंकू असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.